अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या ब्रेकअपनंतर सातत्यानं सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या सुष्मितानं ब्रेकअपनंतर इन्स्टाग्रामवर बऱ्याच पोस्ट केल्या आहेत. पण नुकतीच केलेली तिची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. याच कारण म्हणजे सुष्मिताची मुलगी रेनी सेननं त्यावर कमेंट केली आहे. सुष्मिताच्या ब्रेकअपवर रेनीनं पहिल्यांदा कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्याचं बोललं जातंय.
सुष्मितानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आहे. ४६ वर्षीय सुष्मिता सेननं काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत बॉयफ्रेंड रोहमनसोबतचं नातं संपल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, ‘जेव्हा आपण वर्तमानात काय घडत आहे यावर बोलणं आणि त्याच्या आधारे भविष्यात काय होणार आहे याचा विचार करणं बंद करतो. तिथेच आपल्या साहसाची सुरुवात होते.’ सुष्मिताचा हा फोटो आणि त्यावर तिची मुलगी रेनीनं केलेली कमेंट याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
सुष्मिताच्या फोटोवर कमेंट करताना रेनीनं लिहिलं, ‘तू सर्वकाही व्यवस्थित सांभाळत आहेस.’ अर्थात रेनीनं अप्रत्यक्षपणे तिच्या आईच्या निर्णयाला समर्थन दिलं असल्याचं बोललं जात आहे. रेनीच्या या कमेंटला सुष्मितानं रिप्लाय केला आहे. तिने लिहिलं, ‘रेनी फायर सेन. मी तुझ्यावर खूप प्रेम करते.’ सुष्मिता सेन एक सिंगल मदर आहे. तिनं काही वर्षांपूर्वी रेनी आणि अलिशा यांना दत्तक घेतलं होतं.

दरम्यान सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल यांनी २०१८ साली एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. त्यानंतर काही महिन्यांनी या दोघांनीही सोशल मीडियावरून आपल्या नात्याची कबुली दिली होती. रोहमन आणि सुष्मिताच्या दोन्ही मुलींमध्ये नेहमीच एक चांगलं बॉन्डिंग पाहायला मिळालं होतं. हे दोघं लवकरच लग्न करतील अशी चर्चा असतानाच अचानक सुष्मितानं त्यांचं नातं संपल्याचं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्पष्ट केलं.