रेश्मा राईकवार

गेल्या दीड वर्षांत चित्रपटच प्रदर्शित होऊ न शकल्याने मराठीतील अनेक नावाजलेले कलाकार प्रेक्षकांपासून दूर आहेत. मात्र याही काळात ‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून लोकांसमोर आलेला अभिनेता स्वप्निल जोशीने कलाकार म्हणून वेगवेगळे प्रयोग सुरूच ठेवले. त्याचा ‘बळी’ हा चित्रपट ‘अ‍ॅमेझॉन ओरिजिनल’ म्हणून थेट ओटीटीवर प्रदर्शित होतो आहे. ओटीटी हेच भविष्य आहे, त्यामुळे आमचा चित्रपट थेट अ‍ॅमेझॉनवर प्रदर्शित होतो आहे, याचा आनंद आणि अभिमान आहे, असे स्वप्निल म्हणतो.

स्वप्निल पहिल्यांदाच ‘बळी’ या भूतपटातून प्रेक्षकांसमोर येतो आहे. ‘‘मुळात मला भयपटांचीच खूप भीती वाटते. त्यामुळे ‘बळी’ हा मी केलेला आणि पाहिलेला पहिलाच भयपट आहे,’’ असे तो म्हणतो. दिग्दर्शक विशाल फुरियांनी मला पहिल्यांदा जेव्हा या चित्रपटाची कथा ऐकवली तेव्हाच ती मला खूप विलक्षण वाटली. मुळात चित्रपटाच्या निर्मात्यांबरोबर मी याआधी काम केलं होतं, त्यामुळे सेटअप माझ्या परिचयाचा होता. दिग्दर्शक विशाल फुरियांनी याआधीच ‘लपाछुपी’ या चित्रपटातून मराठीत चांगल्या भयपटांचा एक मापदंड निर्माण केला होता आणि कथाही चांगली होती, त्यामुळे चित्रपट नाकारण्यासाठी कुठलंही कारण नव्हतं. तरीही मी तयार नव्हतो, कारण मला भयपटांचीच भीती वाटते, अशी आठवण तो सांगतो. अर्थात फुरियांनाही स्वप्निलनेच ही भूमिका करावी असं वाटत होतं आणि भय किंवा भूत हा या कथेतला अविभाज्य भाग असला तरी यातल्या बाप-लेकाच्या भावनिक गोष्टीने आपल्याला जास्त आकर्षित केल्यानेच या चित्रपटात भूमिका साकारल्याचं त्याने सांगितलं.

दीड वर्षांच्या लांबलचक कालावधीनंतर आपला चित्रपट चित्रपटगृहातूनच प्रदर्शित व्हावा, असं कोणत्याही कलाकाराला वाटणं साहिजक आहे. स्वप्निल मात्र याला अपवाद ठरला आहे. ओटीटीसारखं नवं माध्यम लोकप्रिय होण्यामागे त्याचं वेड किंवा आकर्षण हे कारण नाही आहे, असं तो स्पष्ट करतो. एक वेगळा आशय या माध्यमाने लोकांसमोर आणला. स्थानिक ते आंतरराष्ट्रीय दर्जाचा आशय, तुमच्या आवडीनिवडी आणि सोयीनुसार पाहण्याची संधी देणारी ओटीटी माध्यमे हेच भविष्य आहे, असं तो ठामपणे सांगतो. स्वत: स्वप्निलने ‘1 ओटीटी’ हे नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म निर्माता नरेंद्र फिरोदिया यांच्याबरोबर विकसित केलं असून पुढच्या वर्षीच्या सुरुवातीलाच ते बाजारात आणण्यासाठी त्यांचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत.

 टिकून राहणं सोपं नाही..

गेले तीस वर्ष स्वप्निल अभियनाच्या क्षेत्रात आहे. गेल्या काही वर्षांत मनोरंजनाची समीकरणं वेगाने आणि मुळापासून बदलली. या सगळय़ा बदलांशी जुळवून घेत कलाकार म्हणून सातत्यानं चांगलं काम करत राहणं आणि टिकून राहणं ही सोपी गोष्ट नाही, असं तो म्हणतो. चित्रपटांचं काय आहे ते आज हिट होतात, उद्या आपटतात. त्यामुळे फक्त चित्रपटांवर अवलंबून न राहता मालिका, दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रम, सूत्रसंचालन, ओटीटीसारख्या नव्या माध्यमाचा शोध असं बरंच काही सातत्याने करत राहण्याचा, माझ्यातील कलाकाराला शोधत राहण्याचा प्रयत्न मी कायम करत आलो आहे. ‘चला हवा येऊ द्या’सारख्या शोच्या माध्यमातून मी गेले कित्येक दिवस प्रेक्षकांसमोर आहे. मी कलाकार म्हणून काही ना काही करतो आहे, याचं मला जास्त समाधान वाटतं. या प्रवासात लेखक, दिग्दर्शक, निर्माते यांनी माझ्यावर विश्वास टाकला, माझ्याकडून ते काम करून घेत आले ही खूप मोठी गोष्ट आहे, असं तो सांगतो. तुम्हाला संधी किंवा पर्याय नशिबाने मिळत असतात, मात्र एकदा ते समोर आल्यानंतर त्यातलं योग्य ते निवडून, त्यासाठी तेवढीच मेहनत घेऊन ते यशस्वी करून देणं हे तुमचं काम आहे. मी यासाठी खूप कष्ट केले आहेत, सतत काम करत राहिलो. सातत्याने वेगळं काही करत राहण्याची भूक आणि जिद्दही तुमच्यात असावी लागते. सुदैवाने माझ्यात ते होतं, म्हणून मी टिकून राहिलो आहे, अशी प्रामाणिक कबुली तो देतो.

‘बळी’नंतर त्याचे अजून दोन चित्रपट लवकरच पाहायला मिळणार आहेत. एक वेबमालिकाही त्याने पूर्ण केली आहे. सध्या त्याचं लक्ष त्याच्या नव्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही केंद्रित झालं आहे. गुंतवणूक नेहमी भविष्यासाठी केली जावी, असं म्हटलं जातं. ओटीटी इतर सगळय़ा माध्यमांबरोबर पुढची दोन दशकं तरी गुण्यागोिवदाने नांदणार आहे, त्यामुळे आपण भविष्यासाठी चांगली गुंतवणूक केली आहे, असं तो विश्वासाने सांगतो.

मी नेहमीच काळाबरोबर किंबहुना काळाच्याही एक पाऊल आधी स्वत:ला भविष्यातील वेध घेऊन बदलत आलो आहे. ओटीटी माध्यमं करोनाच्या या दीड वर्षांच्या काळात प्रचंड लोकप्रिय ठरली, मात्र आपलं स्थानिक भाषेतील ओटीटी माध्यम असावं याचा विचार आम्ही करोनाच्या आधीच सुरू केला होता. नरेंद्र फिरोदिया त्यांचा ओटीटी प्लॅटफॉर्म विकसित करत होते आणि मी माझ्या पद्धतीने करणार होतो. आपापसात स्पर्धा करण्यापेक्षा एकत्र येऊन मोठं ओटीटी प्लॅटफॉर्म का करू नये, असा विचार आम्ही केला. गेले १८-१९ महिने आम्ही या ओटीटीवर काम करतो आहोत. लवकरच ते प्रेक्षकांसमोर असेल. स्वप्निल जोशी