टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदकनिश्चिती केलेल्या भारताची बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहाइन हिच्याकडून भारतीयांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, महिलांच्या ६९ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत लव्हलिनाला पराभवाचा सामना करावा लागला. उपांत्य फेरीत लव्हलिनाचा जगज्जेत्या बुसेनाझ सुर्मीनेलीने पराभव केला. या पराभवामुळे लव्हलिनाला कांस्य पदकावरच समाधान मानावं लागलं आहे. कांस्य पदक जिंकल्यानंतर लव्हलिनावर भारतीयांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने केलेल ट्वीट चर्चेत आहे.
तापसी पन्नूने लव्हलिनाला ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. ‘३ मेडल, तिन्ही महिला! लव्हलिना बोर्गोहाइन तू एक स्टार आहेस आणि तू खूप आक्रमक आहेस’ या आशयाचे ट्वीट तापसीने केले आहे. तिचे हे ट्वीट सध्या चर्चेत आहे. अनेकांनी तिच्या या ट्वीटवर कमेंटवर लव्हलिनाला शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा : अय्यर आणि बबितामध्ये आहे १३ वर्षांचे अंतर, जाणून घ्या ‘तारक मेहता…’मधील कलाकारांचे वय
3 medals 3 females ! @LovlinaBorgohai you are a star and a very aggressive one ! https://t.co/3Nly6NhWM8
— taapsee pannu (@taapsee) August 4, 2021
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचे हे तिसरे पदक आहे. यापूर्वी मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य तर पीव्ही सिंधूने बॅडमिंटनमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. लव्हलिनाचे पदक हे गेल्या नऊ वर्षांतील ऑलिम्पिक बॉक्सिंगमधील भारताचे पहिले पदक आहे. यापूर्वी २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये बॉक्सर मेरी कोमने कांस्यपदक पटकावले होते. त्याचबरोबर पुरुषांच्या बॉक्सिंगमध्ये विजेंदर सिंगने २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले.
लव्हलिना बोर्गोहेन उपांत्य फेरीच्या सामन्यात टर्कीच्या विश्वविजेत्या बुसेनाझ सुर्मीनेलीकडून पराभूत झाली आहे. सामन्यामध्ये लव्हलिनाने तिन्ही फेऱ्या गमावल्या. लव्हलिनाचा ०-५ ने पराभव झाला. त्यामुळे लव्हलिनाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी लव्हलिना तिसरी भारतीय बॉक्सर बनली आहे.