देशभरात नववर्षाच्या जल्लोषाचे वातावरण असताना बंगळुरुमध्ये महिलांसोबत झालेल्या छेडछाडीबद्दल समाजवादी पार्टीचे नेते अबु आझमी यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल अनेकांनी राग व्यक्त केला आहे. अभिनेत्री तापसी पन्नू आणि अभिनेता वरुण धवन यांनी त्यांचा राग ट्विटरवरुन व्यक्त केला.

नववर्षाच्या जल्लोषात बंगळुरुमध्ये महिलांसोबत झालेल्या छेडछाडीबद्दल समाजवादी पार्टीचे नेते अबु आझमी यांनी केलेल्या त्या वक्तव्यावर पिंक अभिनेत्री तापसी म्हणाली की, ‘मी यांना आधीच ‘पिंक’ सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठी बोलवायला हवे होते किंवा सिनेमाचे तिकीट तरी द्यायला हवे होते. ज्यामुळे ते ‘पिंक’ हा सिनेमा पाहू शकले असते.’ तापसीच्या या ट्विटवरुन तिच्या मनातला राग स्पष्ट दिसत आहे.

https://twitter.com/taapsee/status/816194985598947328

बंगळुरुच्या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून वादग्रस्त वक्तव्ये करण्यात आली होती. या प्रकारास पाश्चात्य आचार-विचार जबाबदार असल्याचे वक्तव्य कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी केले होते. समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबु आझमी यांनी महिलांनी परिधान केलेले शॉर्ट ड्रेस या घटनेला कारणीभूत असल्याचे म्हटले होते. जितकी नग्नता तितकी फॅशन जास्त, असे महिलांना वाटते असेही आझमी म्हणाले होते.

तापसीनंतर बॉलिवूड अभिनेता वरुण धवननेही ट्विटकरुन म्हटले होते की, ‘मला फार राग येत आहे. सर, गुन्हेगाराला शिक्षा द्या, मुलींना नाही. त्यांना जसे वाटतील तसे कपडे ते घालू शकतात. ती त्यांची पसंत आहे.’

https://twitter.com/Varun_dvn/status/816217619099316224

दरम्यान, बंगळुरू येथील ब्रिगेड रोड आणि एम. जी. रोडच्या जंक्शनवर नववर्षाच्या पार्टीत पोलिसांची सुरक्षा व्यवस्था असतानाही काही महिलांचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेनंतर कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी देखील वादग्रस्त विधान केले होते. ‘हे चांगले नाही. असा प्रकार पुन्हा होणार नाही. असे कार्यक्रम- समारंभ कशा पद्धतीने पार पाडावेत, याचा विचार करायला हवा. आपल्याकडे दहा हजार पोलिस नाहीत’, असे ते म्हणाले होते. तसेच पार्टीसाठी आलेल्या तरुण-तरुणींनी पाश्चात्यांचे अनुकरण केले होते. केवळ विचारांचेच नव्हे, तर पोषाखांचेही, असे वक्तव्य करून त्यांनी वाद ओढवून घेतला होता.