दाक्षिणात्य अभिनेत्री रेखा यांचा एक जुन्या मुलाखतीमधील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रेखा यांचा हा व्हिडीओ Punnagai Mannan या चित्रपटातील गाजलेल्या किसिंग सीनबद्दल बोलतानाचा आहे. त्यांनी मुलाखतीमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेते कमल हासन यांनी किसिंग सीनसाठी त्यांची परवानगी घेतली नसल्याचे म्हटले आहे.

१९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या Punnagai Mannan या चित्रपटात रेखा आणि अभिनेते कमल हासन मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात रेखा आणि कमल हासन यांचा एक किसिंग सीन त्यावेळी विशेष गाजला होता. पण या किसिंग सीनसाठी कमल हासन आणि चित्रपटाचे दिग्दर्शक बालाचंदर यांनी रेखाची परवानगी घेतली नव्हती. त्यावेळी रेखा य़ा १६ वर्षांच्या होत्या.

मला यावर काही बोलायचे नाही. मला काही लोकांचे फोन आले. पण आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर का व्हायरल होत आहे हे मला ठावूक नाही. ही खूप वर्षांपूर्वीची घटना आहे. माझ्या परवानगी शिवाय हा सीन चित्रपटात दाखवण्यात आला. आता या व्हिडीओवर व्यक्तव्य करुन मी प्रसिद्धी मिळवू इच्छीत नाही. सध्या मी माझ्या प्रोजेक्टमध्ये व्यग्र आहे असे रेखा यांनी आता ‘द न्यूज मिनीट’शी बोलताना म्हटले आहे.