‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाची धूंदी अद्याप प्रेक्षकांच्या मनावरुन उतरलेली नाही. आतापर्यंत २४० कोटींची कमाई करणारा ‘तान्हाजी’ चौथ्या आठवड्यातही जोरदार कमाई करताना दिसत आहे. मात्र या चित्रपटाची लोकप्रियता इतर चित्रपटांसाठी नुकसानदायक ठरत आहे.

या आठवड्यात सैफ अली खानचा ‘जवानी जानेमन’, हिमेश रेशमियाचा ‘हॅप्पी हार्डी अँड हीर’ आणि ‘गुल मकई’ हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. परंतु या तीन पैकी एकाही चित्रपटाबाबत प्रेक्षक फारसे उत्साही दिसले नाहीत.

चौथ्या आठवड्यातही प्रेक्षकांचा कल ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट पाहाण्याच्या दिशेने आहे. प्रेक्षकांच्या आग्रहाखातर हा चित्रपट अद्याप चित्रपटगृहातून उतरलेला नाही. देशभरातील अनेक मल्टिप्लेक्समध्ये दिवसातील दोन शो तान्हाजीला मिळत आहेत. याचा थेट परिणाम इतर चित्रपटांच्या कमाईवर होताना दिसत आहे.

‘जवानी जानेमन’ या चित्रपटात सैफ अली खानसारखा आघाडिचा बॉलिवूड अभिनेता आहे. मात्र या चित्रपटाला पहिल्या दिवशी दोन कोटी रुपये इतकीच कमाई करता आली. तर दुसरीकडे अशीच काहीशी अवस्था हिमेश रेशमियाचा ‘हॅप्पी हार्डी अँड हीर’ या चित्रपटाची झाली. रातोरात प्रसिद्धी मिळालेल्या रानू मंडल यांच्या तेरी मेरी या गाण्यामुळे हा चित्रपट जोरदार चर्चेत होता. गेल्या अनेक महिन्यांपासून या चित्रपटाचे प्रमोशन सुरु होते. या पार्श्वभूमीवर ‘हॅप्पी हार्डी अँड हीर’ कमाल करुन दाखवणार अशी अपेक्षा होती. मात्र तान्हाजीच्या लोकप्रियतेने ही आशा फोल ठरवली. परिणामी या चित्रपटाला केवळ ५० लाख रुपये इतकीच कमाई करता आली. ‘गुल कमाई’ तर वरील दोन चित्रपटांच्या स्पर्धेत दिसलाच नाही. या चित्रपटाला केवळ २५ लाख रुपयांचीच कमाई करता आली.

१० जानेवारीला प्रदर्शीत झालेल्या तान्हाजीने गेल्या दोन आठवड्यात तब्बल १८० कोटी रुपयांची दणदणीत कमाई केली. या तुलनेत ‘जवानी जानेमन’, ‘हॅप्पी हार्डी अँड हीर’ आणि ‘गुल कमाई’ या तीन चित्रपटांना मिळून तीन कोटी रुपये सुद्धा कमावता आले नाहीत.