कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. जवळपास ६ वर्षांनंतर ही जोडी एकत्र दिसणार आहे. सहा वर्षांनी कपिल व सुनील यांच्यातील सर्व मतभेद संपले आहेत आणि ते नव्या शोमध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवताना दिसणार आहेत. भांडणानंतर अनेक वर्षांनी सुनील ग्रोव्हर आणि कपिल शर्मा पडद्यावर एकत्र येत आहेत. दोघेही ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर नवीन शोमधून प्रेक्षकांना हसवण्यासाठी येणार आहेत. आणखी वाचा : ३७ वर्षांनी धर्मेंद्र यांना मिळाला फिल्मफेअर पुरस्कार! त्यावेळी केलेल्या वक्तव्याची आजही चर्चा त्यांनी नवीन प्रोजेक्टची घोषणा केली असून याचा एक प्रोमोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कपिल, सुनील व त्यांची टीम जवळपास १९० देशांमध्ये दौरा करणार आहे. याबाबतच त्यांनी या व्हिडीओतून माहिती दिली आहे. व्हिडीओमध्ये सुनील ग्रोव्हर कपिल शर्मासमोर अट ठेवतो. सुनिल कपिलला म्हणतो की तो विमानाने नाही तर रस्त्याने प्रवास करून ऑस्ट्रेलियाला जाईल. त्यावर कपिल होकार देतो. या व्हिडीओमध्ये राजीव ठाकूर, किकू शारदा, कृष्णा अभिषेक आणि अर्चना पूरण सिंग हेदेखील दिसत आहेत. नुकतंच एका पार्टीमध्ये या दोन्ही कलाकारांना एकत्र पाहिलं गेलं. अर्चना पूरण सिंग यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या दोघांचा फोटो शेअर केला आहे ज्यात हे दोघे कलाकार एकमेकांबरोबर धमाल करताना दिसत आहेत. या पोस्टखाली चाहत्यांनी कॉमेंट करत त्यांचा आनंद व्यक्त केला आहे. डॉ. मशहुर गुलाटी व कपिल शर्मा या दोघांना पुन्हा एकत्र स्क्रीनवर पाहण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक आहेत. त्यांनी त्यांची उत्सुकता त्यांच्या कॉमेंटमधून शेअर केली आहे. कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यात विमानामध्ये भांडण झालं होतं. २०१७ मध्ये झालेल्या या भांडणानंतर सुनील गोव्हरने कपिलचा शो सोडला होता. त्या भांडणानंतर आता जवळपास सहा वर्षांनी त्यांची जोडी पुन्हा एकत्र दिसणार आहे. चाहते त्यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. मात्र, त्याच्या आगामी नव्या प्रोजेक्टचे नाव अद्याप समोर आलेले नाही.