टेलिव्हिजनवर लोकप्रिय ठरलेला ‘खुपते तिथे गुप्ते’ हा मराठी टॉक शो पुन्हा सुरू होत आहे. या कार्यक्रमाचे तिसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या कार्यक्रमाबाबत प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता होती, शिवात प्रेक्षक अत्यंत आवडीने हा कार्यक्रम बघायचे. नेहमीप्रमाणेच संगीतकार आणि गायक अवधूत गुप्ते ‘खुपते तिथे गुप्ते ३’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार असून शोमध्ये हजेरी लावणाऱ्या पाहुण्यांना तो बोलतं करताना दिसणार आहेत. ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली. स्वतःला आणि इतरांना खुपणाऱ्या गोष्टींवरही राज यांनी त्यांच्या खास शैलीत खरमरीत उत्तरं दिली. या कार्यक्रमाच्या रॅपिड फायर राऊंडदरम्यान अवधूतने विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना राज ठाकरे यांनी एक वेगळाच किस्सा सांगितला. "कोणाचा पुतण्या आधी मुख्यमंत्री होणार? बाळासाहेब ठाकरेंचा कि शरद पवारांचा?" या प्रश्नाचं उत्तर देतान राज यांनी एक जुनी आठवण सांगितली. आणखी वाचा : 'खुपते तिथे गुप्ते'च्या मंचावर वॉशिंग पावडरचे पाकीट पाहताच राज ठाकरेंना आठवला सत्ताधारी पक्ष; म्हणाले "हे दिल्लीला…" राज म्हणाले, "सत्तेपेक्षा काय महत्त्वाचं आहे याची मी एक जुनी आठवण सांगतो, मी त्यावेळी लहान होतो आणि माननीय बाळासाहेब यांचे माने नावाचे गाडी चालक होते, ते एकेदिवशी आले नव्हते. त्यामुळे बाळासाहेबांनी बाहेर जाण्यासाठी टॅक्सी बोलावली होती. टॅक्सी गेटवर असतानाच त्यावेळचे महापौर सुधीरभाऊ जोशी आले, त्यावेळी महापौरांची एम्पाला कार होती अन् त्यावर लाल दिवादेखील होता. ते बाळासाहेबांना कामानिमित्त भेटायला आले होते. काम झाल्यावर जेव्हा दोघेही बाहेर पडले तेव्हा सुधीर जोशी यांनी बाळासाहेबांना दादरच्या कार्यालयात सोडण्यासाठी विचारणा केली. पण ती लाल दिव्याची गाडी असल्याने बाळासाहेब म्हणाले की मी टॅक्सीतच बरा आहे." पुढे राज ठाकरे म्हणाले, "मी बाळासाहेबांबरोबर टॅक्सीत बसलो. त्यावेळी आमच्या टॅक्सीच्या मागून महापौरांची गाडी येत होती. ज्या मुलाने लहानपणी लाल दिव्याची गाडी आपल्या मागून येत असताना पाहिली आहे, त्याला त्या गाडीत जाऊन बसायचा मोह कसा होईल? त्यामुळे मुख्यमंत्री या पदाकडे मी एक साधन म्हणून पाहतो." राज ठाकरे यांच्या उत्तरावर लोकांनी टाळ्यांच्या स्वरूपात दाद दिली. अवधूत गुप्ते यांचा हा ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रम ४ जूनपासून दर रविवारी रात्री ९ वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे, याबरोबरच याचे सगळे भाग तुम्हाला ‘झी ५’ ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पाहता येणार आहेत.