अभिनेत्री केतकी चितळेने मराठी भाषेसंदर्भात वादग्रस्त विधान केलं आहे. मराठीला अभिजात दर्जा हवाच कशाला? ही तर निव्वळ असुरक्षितता आहे, मराठी न बोलल्याने भाषेला भोकं पडतात का? असे प्रश्न तिने व्हिडीओ शेअर करून उपस्थित केले आहेत. केतकीच्या या वक्तव्यानंतर तिच्यावर टीका होत आहे.
केतकीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करून मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबद्दल टिप्पणी केली. “आपण अभिजात दर्जाबद्दल बोलूया. अभिजात हा संस्कृत शब्द आहे, जसं मी सांगितलं की अभिजात म्हणजे, स्वतंत्र असायला पाहिजे. दुसऱ्या भाषेवर आधारित नसली पाहिजे. हा जो काही क्रायटेरिया होता तो २०२४ मध्ये काढण्यात आला. मराठी, बंगाली आणि आसामी या भाषांनासुद्धा अभिजात दर्जा मिळावा यासाठी हा क्रायटेरिया काढण्यात आला. पण वैयक्तिकरित्या, मी याच्या विरोधात आहे. जर तुम्हाला अभिजात दर्जा द्यायचा असेल तर तो सगळ्याच भाषांना द्या,” असं केतकी चितळे म्हणाली.
अभिजात दर्जा मागून तुम्ही असुरक्षितता दाखवताय – केतकी चितळे
पुढे केतकीने हिंदी व उर्दू भाषेला अभिजात दर्जा नसण्याबद्दल विधान केलं. “माझ्या एका जवळच्या व्यक्तीने मला असं म्हटलं की हिंदी आणि उर्दूलासुद्धा अभिजात दर्जा नाहीये. त्यामुळे त्यांनीसुद्धा भांडायला पाहिजे. मला असं वाटलं की फक्त दर्जा हवा म्हणून ते का भांडतील? यातून फक्त तुमची असुरक्षितता दिसून येते. दर्जा मिळाला, पण त्यामुळे काय झालं? आम्हाला दर्जा पाहिजे-दर्जा पाहिजे, असं म्हणून तुम्ही तुमची असुरक्षितता दाखवताय,” असं केतकी म्हणाली.
मराठी भाषेला भोकं पडतायत का? – केतकी चितळे
“मराठीत बोल-मराठीत बोल, मराठी येत नाही. अरे.. तो बोलेल नाहीतर नाही बोलणार, त्याने काय मराठी भाषेचं नुकसान होतंय का? भोकं पडतायत का? नाही ना. तुम्ही तुमची स्वतःची असुरक्षितता दाखवताय. त्याने काय फरक पडतो? कोणाच्या आयुष्यात काही फरक पडत नाही”, असं केतकी चितळेने म्हटलंय.
“साधा मुद्दा आहे. एखाद्या भागात आपण जातो, काही काळ राहण्यासाठी जातो, तेव्हा आपल्याला तिथे रोजच्या व्यवहारासाठी तेथील स्थानिक भाषा लिहिता-बोलता-वाचता आली पाहिजे. कालांतराने आणि सहज होणारी गोष्ट आहे ही. “दमदाटी” आणि “नहीं आती, जाओ” ही दोन्ही टोकं गैर आहेत,” अशी कमेंट केतकीच्या व्हिडीओवर एका युजरने केली आहे. ‘अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी पुढील निकष असणे गरजेचे असतात – ती भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे, भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे, भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावेत, प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावा, हे निकष हिंदी किंवा उर्दूला लागू होत नाहीत म्हणून ह्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा नाहीये,’ अशी कमेंट केतकीच्या या व्हिडीओवर आहे.