‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर या कार्यक्रमाचा चाहतावर्ग जगभरात आहे. गेल्या आठ वर्षांपासून या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. गेली अनेक वर्षे सचिन गोस्वामी या कार्यक्रमाचं दिग्दर्शन करत आहेत. यामधील कलाकारांप्रमाणे दिग्दर्शक सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी या दोघांचाही चाहतावर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे. विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना खळखळून कसं हसवायचं हे या दोन्ही दिग्दर्शकांना परिचयाचं आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी २० मे रोजी १३ मतदारसंघांमध्ये मतदान करण्यात आलं. मुंबईतल्या सहा मतदारासंघांसह ठाणे, कल्याण, पालघर, नाशिक, धुळे, दिंडोरी, आणि भिवंडी अशा १३ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली आहे. बॉलीवूडसह मराठी कलाविश्वातीस बऱ्याच कलाकारांनी २० मे रोजी मतदान करत आपलं कर्तव्य बजावलं. याच संदर्भात आता हास्यजत्रेचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा : “ट्रोल केलं, नातेवाईकांचे फोन आले”, रोहित-जुईली लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल स्पष्टच बोलले; म्हणाले, “नाक खुपसू नका…”

सचिन गोस्वामी लिहितात, “काल मतदानाला मी आणि सविता सकाळी ७: ३०ला केंद्रावर गेलो. नेमका आमचा नंबर असलेल्या खोलीबाहेर मोठी रांग…ड्युटीवरील पोलीस कर्मचारी मला निरखून बघत अंदाज काढत होता. शेवटी त्याने निष्कर्ष काढला आणि मला म्हणाला.. ओ तुम्ही तिथं का रांगेत? या इकडे इकडून आत जा…मी गडबडलो…बराच वेळ उभं राहिल्याने पोटऱ्यात गोळे आले होतेच…पडत्या फळाची आज्ञा म्हणून तिथं जाऊन थांबलो.. आता मी ३ नंबरवर होतो..हळूच त्यांच्याकडे पाहून हसत थँक्यू म्हटलं…त्यावर तो म्हणाला ओ, सिनियर सिटिझन रांगेत चक्कर येऊन पडले तर डोक्याला ताप आम्हालाच होणार नाही का? पांढऱ्या केसांमुळे मला सिनियर सिटिझन कॅटेगरीत आणलं आहे…काय करावं…”

हेही वाचा : मराठमोळा साज, पेशवाई लूक अन्…; ‘असं’ पार पडलेलं मुग्धा-प्रथमेशचं लग्न, ५ महिने पूर्ण होताच शेअर केला व्हिडीओ

दरम्यान, सचिन गोस्वामींच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. “हा स्किटचा विषय आहे”, “मी ही त्याच रांगेत आहे”, “सर तुम्ही राजपुत्र आहात म्हणून, रांग बदलली असेल”, “सिनियर म्हणून नाही सोडलं .. राजपुत्र म्हणून पुढे जागा दिली”, “यावर एक जोरदार स्किट होऊन जाऊद्या चौघुलेंना घेऊन” अशा मजेशीर कमेंट्स नेटकऱ्यांनी गोस्वामी यांच्या पोस्टवर केल्या आहेत.