अभिनेता शरद केळकर हा कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. अभिनयाबरोबरच त्याच्या भारदस्त आवाजाची कायमच चर्चा होत असते. सध्या तो ‘हर हर महादेव’ या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट येत्या २५ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शरदने बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली आहे. या निमित्ताने शरद केळकर हा बस बाई बस या कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्यावेळी त्याच्याबरोबर अभिनेत्री सायली संजीवही सहभागी झाली होती. यावेळी शरद केळकरने त्याच्या सिनेसृष्टीतील सुरुवातीच्या काळाबद्दल भाष्य केले.

या कार्यक्रमात शरदला त्याच्या आवाजाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तुमचं व्यक्तिमत्तव, तुमचा आवाज याचे खरं तर लाखो चाहते आहेत. पण एकेकाळी तुम्ही बोलतानाही अडखळायचा. त्यावर कशी मात केली? असा प्रश्न यावेळी शरद केळकरला महिला वर्गाने विचारला. त्यावर त्याने फार सविस्तरपणे उत्तर दिले.
आणखी वाचा : “खरं सांगायचं तर…” सायली संजीवने ऋतुराज गायकवाडबरोबर रिलेशनशिपच्या चर्चांवर मौन सोडले

शरद केळकर नेमकं काय म्हणाला?

“मी लहान असल्यापासून मला एक बोलण्याची अडचण होती. त्यावर उपाय काय हे माहिती नव्हते. पण जेव्हा परिस्थिती उद्भवते तेव्हा समजत जाते. मी जेव्हा मुंबईत काम करण्यासाठी आलो त्यावेळी मला अभिनयात काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी मला त्यांनी काही डायलॉग बोलायला दिले. पण मला ते बोलता येत नव्हते म्हणून एका शो मधून मला पाच दिवसात बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. या मुलाला डायलॉग बोलता येत नाहीत, याला काढून टाका, असे त्यांनी सांगितले होते.

त्यावेळी एक गोष्ट कळली की जर मला या ठिकाणी काम करायचे असेल तर काही ना काही शिकावं लागेल किंवा माझ्या या समस्येवर काही तरी उपाय शोधावा लागेल. आपल्याकडे बऱ्याच जणांना असे वाटते की ही समस्या आत्मविश्वास नसल्याने किंवा मानसिक गोष्टींमुळे उद्भवते. पण माझ्याबाबतीत यातली काहीही नव्हते. माझ्याकडे आत्मविश्वास आहे, कोणाचीही भीती नाही.

माझ्याबद्दल बोलायचं झालं तर माझ्या श्वासोच्छवास करण्यामध्ये एक समस्या होती. श्वास घेण्याची एक पद्धत असते त्यात समस्या होती. तुम्ही जर श्वासाचे विश्लेषण कसे होतं याबद्दल विचार केला, तर तुम्हाला याचा अंदाज येतो. त्यावर थोडं लक्ष दिलं तर तुम्हाला या समस्येपासून मुक्त होता येते”, असे त्याने सांगितले.

आणखी वाचा : “मी स्वतःला कायम छत्रपती…” अभिनेता शरद केळकर स्पष्टच बोलला

दरम्यान शरद केळकर हा पुन्हा एकदा अजय देवगणबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. याआधी शरदने अजय देवगणबरोबर ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’, ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ आणि ‘बादशाहो’ सारख्या चित्रपटात काम केले आहे. त्यानंतर आता तो चौथ्यांदा अजयबरोबर काम करणार आहे. तसेच येत्या २५ ऑक्टोबरला त्याचा हर हर महादेव हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.