मराठी संगीत क्षेत्रातील लोकप्रिय जोडी मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे हे नेहमी आपल्या सुरेल आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असतात. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वातून घराघरात पोहोचलेल्या या जोडीचा मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर दोघं खूप सक्रिय असतात. दैनंदिन जीवनातील अनुभव शेअर करत असतात.

यंदा मुग्धा व प्रथमेशचा लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा होता. हा पहिला गुढीपाडवा दोघांनी आपल्या कुटुंबाबरोबर साजरा केला. यासंबंधित फोटो मुग्धाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.

हेही वाचा – Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची हिंदी कॉमेडी शोमध्ये वर्णी, हेमांगी कवी व कुशल बद्रिकेबरोबर झळकला

“लग्नानंतरचा आमचा पहिला पाडवा,” असं लिहित मुग्धाने फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये मुग्धा, प्रथमेश आपल्या कुटुंबाबरोबर दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये दोघं मुग्धाची मोठी बहीण मृदुला व तिच्या नवरा विश्वजीत जोगळेकरसह पाहायला मिळत आहेत. मुग्धा व प्रथमेशने त्यांच्या लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा अलिबागला साजरा केला.

मुग्धा-प्रथमेशची लव्हस्टोरी

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्येच मुग्धा आणि प्रथमेशची ओळख झाली. त्यानंतर दोघांचे एकत्र गाण्याचे कार्यक्रम सुरू झाले. या गाण्यांच्या कार्यक्रमामुळे मुग्धा व प्रथमेशचं सतत भेटणं होऊ लागलं. यादरम्यान दोघांना एकमेकांविषयी भावना निर्माण झाल्या. त्यानंतर प्रथमेशने एका कार्यक्रमाच्या तालीमच्या वेळी आवांतर गप्पा झाल्यानंतर मुग्धाला विचारलं.

हेही वाचा – Video: चेंगराचेंगरी, पोलिसांच्या लाठीचार्जनंतर अखेर चाहत्यांना दिसली सलमान खानची झलक, भाईजानने खास अंदाजात दिल्या ईदच्या शुभेच्छा

प्रथमेश विचारणार याची मुग्धाला थोडी कल्पना होती. मुग्धाचे उत्तर काय असणार? हे प्रथमेशला माहित होतं. पण तरीही मुग्धाने प्रथमेशला होकार देण्यासाठी तीन-चार दिवस घेतले. मग एकेदिवशी तिने त्याला भेटायला बोलवून होकार कळवला. त्यानंतर दोघं एकमेकांना डेट करू लागले आणि काही काळाने दोघांनी नात्याबद्दल एकत्र घरच्यांना सांगायचं ठरवलं. घरच्यांना सांगितल्यानंतर दोघांनी संसार थाटण्याचा निर्णय घेतला. गेल्यावर्षी २१ डिसेंबरला दोघं लग्नबंधनात अडकले.