मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लग्नसराई सुरू असल्याचं बघायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री अमृता देशमुख व प्रसाद जवादेने लग्नगाठ बांधली. आता ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’फेम गायिका मुग्धा वैशंपायनची मोठी बहीण मृदुल वैशंपायनचा लग्नसोहळा नुकताच पार पडला. या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
हेही वाचा- पियुष रानडेशी लग्न करण्याचा निर्णय का घेतला? सुरुची अडारकर म्हणाली, “तो माणूस म्हणून…”
अभिनेत्री तृष्णा चंद्रतेने आपल्या इन्स्टाग्रामवर मृदुलच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. मृदुलने आपल्या लग्नात पारंपरिक लूक परिधान केला होता. लाल रंगाच्या साडीत मृदुल खूपच सुंदर दिसत होती. लाल रंगाच्या साडीवर मृदुलने हिरव्या रंगाचा शेला परिधान केला होता, तर मृदुलच्या नवऱ्याने लाल रंगाचे सोवळं आणि उपर्ण परिधान केलं होतं. दोघांचा हा पारंपरिक लूक सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता. केळीची पाने आणि फुलांनी मंडपाची सजावट करण्यात आली होती.
काही दिवसांपूर्वीच मुग्धाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या बहिणीचं लग्न ठरलं असल्याचे जाहीर केलं होतं. केळवणीचा फोटो शेअऱ करत ही आनंदाची बातमी दिली होती. त्यानंतर मुग्धाने मृदुलच्या ग्रहमख आणि हळदीचे फोटो शेअर केले होते. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. अनेकांनी या फोटोवर कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला होता.
बहिणीच्या लग्नानंतर आता मुग्धाही लग्नबंधनात अडकणार आहे. मुग्धा आणि गायक प्रथमेश लघाटे लवकरच लग्न करणार आहेत. काही महिन्यांपूर्वीच दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. नुकताच पारंपरिक पद्धतीने दोघांचा साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.