Actress Prajakta Mali : भाजपा आमदार सुरेश धस यांनी काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी यांची नावं घेतली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर प्राजक्ताने मुंबईत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. राजकारणासाठी महिला कलाकारांच्या नावाचा गैरवापर होणं चुकीचं आहे त्यामुळे सुरेश धस यांनी माफी मागावी, अशी मागणी तिने केली होती. याप्रकरणी अभिनेत्रीने मुख्यमंत्र्यांची भेट घेत निवेदन सादर केलं होतं. अखेर सोमवारी, माझ्या वक्तव्याचा गैर अर्थ काढला गेला असं सांगत सुरेश धस यांनी या घडल्या प्रकारावर दिलगिरी व्यक्त केली.

सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केल्यावर प्राजक्ता माळीने व्हिडीओ शेअर करत “आज या संपूर्ण प्रकरणावर माझ्याकडूनही मी पडदा टाकतेय” असं सांगत सर्वांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा : Suresh Dhas Vs Prajakta Mali : “प्राजक्ताताई माळींसह मी सर्व स्त्रियांचा आदर करतो, त्यांची मनं दुखावली..”, सुरेश धस यांची अखेर दिलगिरी

प्राजक्ता माळी म्हणाली, “सगळ्यांना माझा नम्रतापूर्वक नमस्कार, संबंध महाराष्ट्राचे मी मनापासून आभार मानते. पत्रकार परिषद घेतल्यापासून ते आतापर्यंत माझ्या कुटुंबीयांना अनेक मेसेज आले. महिलांच्या सन्मानासाठी सर्व स्तरांतून आवाज उठवला गेला. मला पाठिंबा दिला गेला, यामुळे आम्हाला बळ मिळालं…समाधान वाटलं. खूप खूप धन्यवाद! याशिवाय आमदार सुरेश धस यांचेही मी मनापासून आभार मानते. अत्यंत मोठ्या मनाने त्यांनी देखील समस्त महिलावर्गाची माफी मागितली. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, दादा खूप धन्यवाद. यामुळे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक आहात हे दाखवून दिलंत. छत्रपतींची भूमिका महिलांच्या सन्मानासाठी किती कठोर होती हे आपण सगळेजण जाणतो आणि ही छत्रपतींची भूमी आहे त्यांचे विचार सदैव इथे असतील हे तुम्ही या कृतीतून दाखवून दिलं आहे.”

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील मी मनापासून आभार मानते. त्यांनी यात जातीने लक्ष घातलं. अत्यंत निगुतीने आणि संवेदनशीलतेने त्यांना हा विषय पुढे नेला, मार्गी लावला. त्याचबरोबर महिला आयोग आणि त्याच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे देखील आभार. मी याठिकाणी एक गोष्ट नमूद करते की, आमदार साहेबांनी माफी मागितल्यामुळे मी त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही. मी करु इच्छित नाही. आज या संपूर्ण प्रकरणावर माझ्याकडूनही मी पडदा टाकतेय” अशी प्रतिक्रिया प्राजक्ता माळीने दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, प्राजक्ताने पत्रकार परिषद घेऊन माफीची मागणी केल्यावर या संपूर्ण प्रकरणावर अखेरिस दिलगिरी व्यक्त करत सुरेश धस यांनी “मी प्राजक्ताताई माळींबाबत जे बोललो त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबत काही बोलण्याचा विषयच नव्हता. मी प्राजक्ताताईसहित सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो. माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे मन दुखावले असेलतर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो.” असं म्हटलं होतं.