राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतीच टेस्ला कार घेतली आहे. एलॉन मस्क यांची कंपनी ‘टेस्ला’ने अलीकडेच भारतात त्यांचं पहिलं शोरूम सुरू केलं आहे. या शोरूममधून कंपनीने त्यांची पहिली कार विकली आहे आणि ही कार प्रताप सरनाईक यांनी खरेदी केली आहे.

या टेस्ला गाडीची किंमत जवळपास ६० ते ७० लाख रुपयांच्या घरात आहे आणि सरनाईकांनी त्यांच्या नातवासाठी ही महागडी कार खरेदी केली आहे. याबद्दल त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी प्रताप सरनाईक म्हणाले, “मी ही कार घेऊन आनंदी झालो आहे. ही कार मी माझ्या नातवाला भेट देतोय. ही कार घेऊन त्याला शाळेत पाठवलं जाईल, त्यावेळी इतर मुलं ही कार पाहतील. इतर मुलांमध्ये जनजागृती होईल. जे लोक कार खरेदी करू शकतात ते अशा इलेक्ट्रिक कार्सना प्राधान्य देतील.”

टेस्लाची महागडी कार नातवाला भेट म्हणून दिल्याबद्दल प्रताप सरनाईक यांच्यावर टीका होत आहे. राजकीय क्षेत्रातून त्यांच्यावर टीका होत असतानाच मराठी अभिनेत्यानेसुद्धा सरनाईकांबद्दल पोस्ट शेअर केली आहे. आस्ताद काळे हा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो अनेकदा राजकीय पोस्ट शेअर करत असतो.

अशातच आस्तादने प्रताप सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदी केल्याबद्दल उपरोधिक पोस्ट शेअर केली आहे. तसंच या पोस्टमधून त्याने काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये आस्ताद म्हणतो, “त्या नातवासाठी घेतलेल्या नवीन Tesla रूपी खेळण्याची किंमत किती आहे हो काका? आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या, कर भरणाऱ्या तरीही खड्ड्यांमधून, आमच्या कष्टाच्या पैशांतून घेतलेली वाहनं चालवावी लागणाऱ्या आमच्यासारख्या नागरिकांच्या जीवाची किंमत किती आहे हो काका?”

यापुढे आस्तादने “एवढा पैसा कुठून आला काका?” असा प्रश्न विचारत “तुमच्या लाडक्या नातवाला लाल दिव्यांचा ताफा बरोबर न घेता ते खेळणं घोडबंदर रस्त्यावरून न्यायला सांगा ना” असंही म्हटलंय. तर या पोस्टच्या कॅप्शनमध्ये आस्ताद म्हणतो, “उत्तरं नसतीलच… आपण प्रश्न विचारत राहायचं…”

आस्ताद काळे इन्स्टाग्राम पोस्ट

दरम्यान, आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा आस्ताद सोशल मीडियावरही कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर कामाबद्दलची माहिती शेअर करण्याबरोबरच तो राजकीय पोस्टही शेअर करत असतो. या पोस्टमधून तो अनेकदा राजकीय मंडळींना प्रश्न विचारतो. अशातच आता त्याची ही पोस्ट व्हायरल होत आहे.