नवनवीन मालिका येण्याचं सत्र अजूनही कायम आहे. टीआरपीसाठी सुरू असलेल्या स्पर्धेत वाहिन्या वेगवेगळ्या विषयांवर आधारित नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. अशातच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर आणखी एक नवी मालिका सुरू होणार असल्याचं समोर आलं आहे. अभिनेता विशाल निकम व अभिनेत्री पूजा बिराराच्या ‘येड लागलं प्रेमाचं’ या नव्या मालिकेसह आणखी एक नवी मालिका सुरू होणार आहे. संगीतकार अविनाश चंद्रचूड यांनी केलेल्या पोस्टमधून ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेचा खुलासा झाला आहे.

‘स्टार प्रवाह’वरील आगामी नव्या मालिकेचं नाव ‘थोडं तुझं थोडं माझं’ असं आहे. या नव्या मालिकेचं शीर्षकगीत लोकप्रिय गायिका आर्या आंबेकर व नचिकेत लेलेनं गायलं आहे. तसंच वैभव जोशी यांनी लिहिलं असून अविनाश-विश्वजीत या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केलं आहे.

हेही वाचा – Video: जबरदस्त डान्स अन् बरंच काही…; ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिनेत्याचा ‘असा’ पार पडला साखरपुडा, पाहा पहिला व्हिडीओ

अविनाश चंद्रचूड यांनी इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर करून लिहिलं आहे, “लवकरचं भेटीला येणार आहे नवीन मालिका ‘थोडं तुझं थोडं माझं’ ‘स्टार प्रवाह’वर आणि त्याचं २३ एप्रिलला शीर्षकगीत रेकॉर्ड आर्या आंबेकर आणि नचिकेत लेले यांच्या स्वरांमध्ये केलं. वैभव जोशी यांचे शब्द आहेत आणि अविनाश-विश्वजीत यांनी संगीतबद्ध केलं आहे.”

हेही वाचा – संजय मोने-सुकन्या मोने का करत नाहीत एकत्र काम? जाणून घ्या…

दरम्यान, अद्याप ‘स्टार प्रवाह’नं ‘थोडं तुझं थोडं माझं’ या नव्या मालिकेची अधिकृत घोषणा केली नाही. पण अविनाश यांच्या पोस्टमधून ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचं निश्चित झालं आहे. त्यामुळे आता ‘थोडं तुझं थोडं माझं’ या नव्या मालिकेत कोणते कलाकार असणार? कधीपासून ही मालिका सुरू होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं येत्या काळातचं मिळतील.