Titeekshaa Tawde and Siddharth Bodke Wedding : ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्री तितीक्षा तावडे व ‘दृश्यम २’ फेम अभिनेता सिद्धार्थ बोडके यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. काही दिवसांपूर्वी केळवणाचा फोटो शेअर करत या जोडप्याने इन्स्टाग्रामवर प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. आता तितीक्षा-सिद्धार्थच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे.

गुपचूप साखरपुडा उरकल्यानंतर आता तितीक्षा व सिद्धार्थ यांच्या हळदी समारंभाला सुरुवात झालेली आहे. या दोघांच्या हळदीचे खास फोटो व व्हिडीओ त्यांच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ऋतुजा बागवे, अनघा अतुल, रसिका सुनील या सगळ्या अभिनेत्री खास लाडक्या मैत्रिणीच्या लग्नासाठी पोहोचल्या आहेत.

हेही वाचा : तितीक्षा तावडे – सिद्धार्थ बोडके यांनी गुपचूप उरकला साखरपुडा, समारंभातील पहिला फोटो आला समोर

तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडके यांच्या हळदी समारंभातील एका खास व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये अभिनेता त्याच्या वडिलांबरोबर डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. हळदी समारंभाला तितीक्षाने पांढऱ्या रंगाची साडी नेसून त्यावर फुलांचे आकर्षक दागिने परिधान केले आहेत. तर सिद्धार्थने खास पांढऱ्या रंगाचा सदरा घातल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : लग्नानंतर रकुल प्रीत सिंगने सासरी पहिल्यांदा बनविला ‘हा’ खास पदार्थ; फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली…

दरम्यान, साखरपुडा व हळदी समारंभ पार पडल्यावर आता ही जोडी लवकरच लग्नगाठ बांधून नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. तितीक्षा व सिद्धार्थच्या चाहत्यांनी तसेच मराठी कलाकारांनी या जोडप्याच्या साखरपुड्याच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.