कॉमिक बुकमधून जन्माला आलेल्या अनेक व्यक्तिरेखा आज हॉलीवूडच्या रुपेरी पडद्याला व्यापून उरल्या आहेत. स्पायडरमॅन, आयर्नमॅनसारखे सुपरहिरो असतील किंवा ‘लोगन’सारखी (वुल्वरिन) व्यक्तिरेखा.. त्या व्यक्तिरेखा आणि ते साकारणारे कलाकार हे इतकं घट्ट समीकरण प्रेक्षकांच्या मनात उभं राहिलं आहे की या कलाकारांनी त्यातून बाहेर पडायचा निर्णय घेतला तर एकतर ती व्यक्तिरेखाच संपवायची किंवा पुन्हा नव्या संचात उभी करायची एवढाच पर्याय त्यांच्या कर्त्यांसमोर उभा राहतो. सध्या असाच पेच ‘लोगन’च्या भूमिकेतून राजीनामा देणाऱ्या अभिनेता ह्य़ू जॅकमनमुळे ‘डिस्ने’ आणि ‘फॉक्स’ यांच्यासमोर उभा राहिला आहे. रूढार्थाने या वर्षी मार्चमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लोगन’ या चित्रपटातून लोगनचा म्हणजेच वुल्वरिनचा शेवट झाला आहे. नुकत्याच जॅकमननेही आपण यापुढे लोगन म्हणून दिसणार नाही, असे सांगितले असल्याने चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलं आहे. पण त्याच वेळी कोटय़वधी रुपयांची कमाई करणारी ही व्यक्तिरेखा पुन्हा जन्माला घालण्यासाठीही (रिबूट) हालचाली सुरू झाल्या असून त्यासाठी जॅकमनशिवाय पर्याय नसल्याने यावर सुवर्णमध्य काढण्याचे पर्याय सुरू आहेत.
जॅकमनच्या निर्णयावरून चाहत्यांनी राग, दु:ख काहीही व्यक्त केलं असलं तरी या सर्व प्रतिक्रियांमागे जॅकमनने ‘वुल्वरिन’ या व्यक्तिरेखेतून बाहेर पडू नये हाच उद्देश आहे. एखाद्या व्यक्तिरेखेमुळे एखादा कलाकार मोठा होतो किंवा एखादा कलाकार व्यक्तिरेखेला मोठा करतो. उदा. ‘स्पायडरमॅन’ या व्यक्तिरेखेमुळे अभिनेता टॉम हॉलंडला प्रसिद्धी मिळाली. तर याच्या बरोबर उलट रॉबर्ट डाउनी ज्युनिअरमुळे ‘आयर्नमॅन’ ही व्यक्तिरेखा लोकप्रिय झाली. परंतु, ‘वुल्वरिन’ ही जितकी प्रभावी व्यक्तिरेखा आहे तितकीच ती साकारणारा जॅकमनही त्याच ताकदीचा आहे. त्यामुळे ते दोघेही एकमेकांत एकरूप झालेले दिसतात. इतकी अफाट लोकप्रियता मिळवणारा हा ‘वुल्वरिन’ नेमका आहे तरी कोण?
वुल्वरिन या सुपरहिरोचा जन्म ‘माव्र्हल’चे संपादक रॉय थॉमस यांच्या कल्पनेतून झाला. नोव्हेंबर १९७४ साली ‘द इन्क्रेडिबल हल्क # ८०’ कॉमिकमधून या सुपरहिरोच्या कारकीर्दीची सुरुवात झाली. सत्तरच्या दशकात सुपरहिरो कॉमिक्सचा विस्तार जगभरात होत असताना त्याचा सर्वात जास्त प्रभाव कॅनडात दिसून आला. त्यामुळे तेथील वाचकांना कॉमिकमध्ये आणखी गुंतवण्यासाठी एखाद्या कॅनेडियन सुपरहिरोची गरज भासू लागली. त्या वेळी थॉमस यांनी ही जबाबदारी लेखक लेन वेन यांच्यावर सोपवली. लेन यांनाही ही कल्पना आवडली आणि त्यांनी जॉन रोमिटा यांच्या मदतीने ‘वुल्वरिन’ या व्यक्तिरेखेची निर्मिती केली. या ‘म्युटंट’ सुपरहिरोला ‘वुल्वरिन’व्यतिरिक्त ‘लोगन’, ‘वेपन एक्स’ आणि ‘एक्स मॅन’ या नावांनीही ओळखले जाते. इतिहासातील अनेक महान व्यक्तींच्या जन्म व मृत्यूच्या तारखांचा घोळ आपण पाहिला आहे. अशा वेळी आपल्या सोयीसाठी काही कथा रचल्या जातात. आणि या कथांच्या माध्यमातून त्या व्यक्तीची कारकीर्द उलगडण्याचा प्रयत्न केला जातो. वुल्वरिनच्या बाबतीतही अगदी तेच घडले आहे. १९७४ साली तयार करण्यात आलेल्या कथेला पुढे अनेक फाटे फुटले. इतक्या वेगवेगळ्या कथा रचण्यात आल्या की प्रत्येक कथेला स्वत्रंत टाइमलाइन तयार करावी लागली. चित्रपट आणि कॉमिक्स या दोघांमधील कथांमध्येही खूप तफावत असल्यामुळे इतर सुपरहिरोंच्या तुलनेने वुल्वरिन ही व्यक्तिरेखा समजण्यास थोडी जड जाते. परंतु या सर्व गोंधळात एक कथा खूप गाजली आणि पुढे त्याच कथेला वुल्वरिनची अधिकृत जन्मकथा म्हणून घोषित करण्यात आले.
वुल्वरिनचे खरे नाव ‘जेम्स हडसन’ आहे. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात कॅनडामध्ये एका गर्भश्रीमंत घरात जेम्सचा जन्म झाला. शारीरिकदृष्टय़ा कमजोर असल्यामुळे त्याचे वडील त्याला पसंत करत नसत. एकदा त्याची आई खूप आजारी पडते तेव्हा तिची देखभाल करण्यासाठी त्याचे वडील रोझ ओव्हारा या एका आयरिश तरुणीला नोकरीवर ठेवतात. जेम्स ओव्हाराच्या संपर्कात येतो आणि हळूहळू बदलू लागतो. त्याच्यातला आत्मविश्वास वाढतो. आजवर अंधाऱ्या खोलीत स्वत:ला कोंडून ठेवणारा जेम्स त्याच्याच वयाच्या इतर मुलांबरोबर बागडू लागतो. त्याचं हे बदलेलं रूप त्याच्या वडिलांना आवडू लागतं. त्यांच्यातील मतभेद कमी होतात, मात्र त्याच दरम्यान त्याच्या घरी चोरी होते आणि त्या चोराला रोखण्याच्या प्रयत्नात त्याच्या वडिलांचा खून होतो. दुर्दैवाने जेम्स त्या खुन्याचा चेहरा पाहतो आणि दु:ख व राग या मिश्र भावनांनी तो त्या गुन्हेगारावर तुटून पडतो. त्याच वेळी त्याच्या शरीरातील सुप्त शक्ती जागृत होतात. एखाद्या हिंस्र प्राण्यासारखी त्याची नखं बाहेर पडतात आणि त्यांच्या साहाय्याने तो त्या गुन्हेगाराचा जीव घेतो. ही गोष्ट जेव्हा त्याच्या आईला कळते तेव्हा संतापलेली आई त्याच्या जन्माचे रहस्य सांगते. ज्या गुन्हेगाराला त्याने मारले आहे तोच त्याचा खरा बाप होता. हे ऐकून जेम्स आणखीन गोंधळतो आणि रोझच्या मदतीने तेथून पळ काढतो. कॅनडातील एका लहानशा खेडय़ात ते वास्तव्य करू लागतात. सुरक्षित राहण्याच्या उद्देशाने ते आपली नावे खोटी सांगतात. रोझ जेम्सची ओळख लोगन अशी करून देते. आणि त्या वेळेपासून जेम्स हडसनचे कायमस्वरूपी नाव ‘लोगन’ होते. ज्या व्यक्तीला त्याने मारले होते त्याचे नाव थॉमस लोगन होते. त्यामुळे लोगन हे नाव रोझच्या डोळ्यासमोर येते आणि तेच नाव ती उच्चारते. पुढे आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी लोगनला नोकरी करावी लागते. कामाच्या प्रती त्याची दृढता आणि निश्चय पाहून त्याचे सहकारी त्याला ‘वुल्वरिन’ या नावाने हाक मारू लागतात. आणि त्या वेळेपासून लोगनचा वुल्वरिन होतो. पुढे तो कॅप्टन अमेरिका या सुपरहिरोच्या संपर्कात येऊन सुलतानी संकटांशी दोन हात करू लागतो. वुल्वरिनची सर्वात मोठी शक्ती म्हणजे त्याची जखम भरण्याची क्षमता होय.
त्याच्या या असामान्य क्षमतेमुळे त्याचे वय त्याच्या इतर सहकारी-नातेवाईकांपेक्षा अगदी धिम्या गतीने पुढे जाते. जवळच्यांचा मृत्यू झाल्यानंतर तो एकटा पडत जातो. पुढे जंगलात राहून ध्येयशून्य आयुष्य व्यतीत करत असताना ‘वेपन एक्स’ नावाची एक संस्था त्याचे अपहरण करते. ही टोळी सुपरपॉवर असलेल्या मंडळींचा आपल्या राक्षसी योजना पूर्ण करण्यासाठी वापर करत असते. प्रोफेसर अब्राहीम कॉर्नेलिअस व कॅरल हिंस त्याच्या मेंदूवर विविध प्रयोग करून त्याला एखाद्या खेळण्याप्रमाणे वापरतात. त्याच दरम्यान ‘विंटर सोल्जर’ त्याला या मानसिक आणि शारीरिक छळातून मुक्त करतो. पुढे तो कॅनडा सरकारच्या ‘डिपार्टमेंट एच’ या गुप्तहेर संघटनेत काम करू लागतो. दरम्यान त्याला सुपरहिरो ‘हल्क’च्या शोधमोहिमेवर पाठवण्यात येते. त्याच दरम्यान त्याला हल्कमुळे ‘टीम अॅव्हेंजर्स’ची माहिती मिळते. त्याच वेळी ‘एक्समेन’चे संस्थापक ‘प्रोफेसर एक्स’ यांचीही नजर वुल्वरिनवर पडते. आणि ते त्याचा सामावेश ‘टीम एक्समेन’मध्ये करतात. आणि वुल्वरिनचे नामांतरण ‘एक्समेन’ असे होते. आता इथून पुढे वुल्वरिनच्या दोन टाइमलाइन पडतात. एका कथामालिकेत तो हल्कबरोबर टीम अॅव्हेंजर्समध्ये जातो. आणि दुसऱ्या कथामालिकेत तो ‘एक्समेन’ म्हणून काम करू लागतो. या दोन्ही कथांचा विस्तार अगदी वेगवेगळ्या प्रकारे केला गेला आहे. परंतु, चित्रपटात लोगन दिसला तो मात्र ‘एक्समेन’ चित्रपट मालिकेतच.. कारण, २००१ साली ‘अॅव्हेंजर्स’ ही संकल्पना चित्रपटांमध्ये अस्तित्वातच नव्हती.
‘लोगन’च्या शेवटाबद्दलचं गूढ कायम
२०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘द वुल्वरिन एक्स्टेंडेड’ या चित्रपटानुसार ‘लोगन’ हा अमरत्व प्राप्त केलेला सुपरहिरो आहे. जखमा भरून येण्याच्या त्याच्या क्षमतेसह ‘मार्शल आर्ट मास्टर’, ‘सुपर स्टॅमिना’, ‘नाइट व्हिजन’, ‘अॅडमॅन्टियम बोन्स’सारख्या अनेक क्षमता या व्यक्तिरेखेला दिलेल्या असल्याने त्याला सगळ्या सुपरहिरोंमध्ये मानाचे स्थान आहे. त्यामुळे तो मरणारच नाही हा चाहत्यांचा ठाम विश्वास असताना ‘लोगन’मध्ये त्याचा मृत्यू दाखवण्यात आला. त्याला आधार दिला तो ‘वेपन एक्स’ टोळीने अपहरण केल्यानंतर प्रोफेसर अब्राहीम कार्नेलिअस यांनी ‘अॅडमॅन्टियम’ या धातूचा एक यशस्वी प्रयोग त्याच्या शरीरावर केला या कथेचा.. या प्रयोगात त्याच्या शरीरातील हाडांमधील ‘कॅल्शिअम’ काढून त्या जागी ‘अॅडमॅन्टियम’ हा धातू टाकला जातो. त्यामुळे त्याचे संपूर्ण शरीर धातूचे बनते. लोगन या चित्रपटातील स्पष्टीकरणानुसार वुल्वरिनचा मृत्यू अॅडमॅन्टियमच्या विषबाधेमुळे होतो. म्हणजे कोणताही धातू पाणी आणि ऑक्सिजनच्या संपर्कात सातत्याने आल्यास कालांतराने त्याला गंज पकडतो अगदी त्याचप्रमाणे वुल्वरिनच्या शरीरातील ‘अॅडमॅन्टियम’ या धातूलादेखील गंज पकडतो. परिणामी त्याच्या अलौकिक क्षमता संपुष्टात येतात आणि तो मरतो. मात्र ‘एक्समेन’ ही मालिकाच म्युटंट सुपरहिरोंची आहे. आपलं शरीर अग्नी, वारा, पाणी, तेज आणि आकाश या पंजमहाभूतांपासून तयार झाले आहे असं म्हटलं जातं. यांतील प्रत्येक घटकाचे स्वत:चे असे एक निश्चित प्रमाण आहे. परंतु या प्रमाणात थोडाफार बदल झाला तर त्या व्यक्तीला काही अलौकिक शक्ती प्राप्त होतात ज्यांना कथाकाराने ‘म्युटंट’ असं म्हटलं असून वुल्वरिन हा त्यांच्यातलाच आहे. सजीवांच्या शरीरातील विविध गुणधर्म हे त्यांच्यातील ‘जीन्स’च्या रचनेवरून ठरत असतात. वुल्वरिनकडे असलेल्या अलौकिक शक्तीचा मूळ स्रोत त्याच्या जीन्समध्ये आहे. आणि म्हणूनच ‘अॅडमॅन्टियम’ धातूच्या जीवघेण्या प्रयोगातूनही ती जिवंत राहणारी एकमेव व्यक्ती आहे. याचा अर्थ तो धातू शरीरात येण्याआधीपासूनच तो या अनोख्या शक्तींचा धनी आहे. लोगनची संपूर्ण कारकीर्द पाहिली तर गेली १४० वर्षे तो जिवंत आहे. आणि शंभरहून अधिक वर्षे तो धातू त्याच्या शरीरात आहे. ‘द वुल्वरिन एक्स्टेंडेड’ या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे न्यूक्लियर विस्फोटातदेखील न वितळणारा ‘अॅडमॅन्टियम’ धातू एकाएकी गंज कसा पकडू शकतो?, या एका प्रश्नाने लोगनच्या मृत्यूभोवती संशय निर्माण केला आहे.
लोगन परतू शकतो..
नेमकी हीच शक्यता पकडून लोगन पुन्हा येऊ शकतो, मात्र तो रुपेरी पडद्यावर येण्यासाठी हॉलीवूडच्या दोन नामांकित निर्मितीसंस्थांना काहीएक निर्णय घ्यावा लागणार आहे. ‘माव्र्हल’पट हे ‘वॉल्ट डिस्ने’च्या ताब्यात आहेत. तर ‘एक्समेन’ चित्रपट मालिका ‘फॉक्स स्टुडिओ’कडे आहे. लोगनच्या मूळ कथेप्रमाणे तो आणि हल्क एकत्रित येऊन ते ‘अॅव्हेंजर्स’मध्ये दाखल होतात. गेली १७ वर्षे नऊ विविध चित्रपटांमधून लोगन साकारल्यानंतर ह्य़ू जॅकमनलाही ‘अॅव्हेंजर्स’ मालिकेत लोगन म्हणून काम करायची इच्छा होती. मात्र ‘डिस्ने’ आणि ‘फॉक्स’ या दोन निर्मितीसंस्थांमध्ये माव्र्हलच्या या व्यक्तिरेखा वाटल्या गेल्यामुळे ते शक्य झाले नाही. तसे झाले तर आपण लोगनच्या भूमिकेतून निवृत्त होण्याच्या आपल्या निर्णयाचा फेरविचार करू शकतो, असं जॅकमनने जाहीरपणे सांगितले होते. सध्या तरी ‘फॉक्स’कडून ‘एक्समेन’ चित्रपट मालिकेचे हक्क विकत घेण्याचे ‘डिस्ने’चे प्रयत्न सुरू आहेत. पण अजूनही या गोष्टी चर्चेच्याच पातळीवर आहेत. दुसरा एक पर्याय म्हणून ‘लोगन’ ही व्यक्तिरेखा रिबूट करण्याचाही माव्र्हलचा विचार आहे. मात्र तसे झाले तर जॅकमन लोगनच्या भूमिकेत असणार नाही आणि जॅकमनने ज्या ताकदीने ही व्यक्तिरेखा उभी केली ते पाहता पुन्हा तशी कमाल अन्य कलाकाराला साधणे कठीण आहे हेही निर्मात्यांना पक्के ठाऊक आहे. काल्पनिक असल्या तरी या व्यक्तिरेखांनी रुपेरी पडद्याच्या माध्यमातून एक मोठं, कमालीचं आर्थिक विश्व उभं केलं आहे. त्यामुळे या विश्वाची सूत्रे हातात असणाऱ्यांना प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलावे लागते आहे. या सगळ्या हाराकिरीत ‘लोगन’ ही व्यक्तिरेखा जॅकमनसह उभी राहिली आणि ‘अॅव्हेंजर्स’च्या विश्वात दाखल झाली तर खुद्द जॅकमन आणि त्याच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची पर्वणी ठरणार आहे.