विविध मनोरंजन वाहिन्यांवर दैनंदिन मालिका सुरू झाल्यानंतर प्रेक्षकांना आपल्याच वाहिनीवर खिळवून ठेवण्यासाठी प्रत्येक वाहिनीने कंबर कसली आहे. या सगळ्यात मालिकांचा ‘टीआरपी’ टिकवणे आणि वाढवणे हा महत्त्वाचा भाग मानण्यात येतो. त्यासाठी मालिकेच्या कथानकात अचंबित करणाऱ्या घटना घडवणे, मालिकेतील एखादा प्रसंग, कथानकाचे वळण याची नक्कल करणे आदी खटाटोप केले जातात. इंग्रजी मालिका किंवा कार्यक्रमांची नक्कल हिंदी वाहिन्या आणि हिंदी वाहिन्यांची नक्कल मराठी मनोरंजन वाहिन्या करत असतात. एकमेकांच्या कल्पना, विषय चोरणे हे मनोरंजन वाहिन्यांवर सर्रास सुरू असते. एकमेकांवर कुरघोडी करताना प्रेक्षक पळविण्याचा किंवा वळविण्याचा एककलमी कार्यक्रमही या वाहिन्यांमध्ये सुरू असतो. मराठी मनोरंजन वाहिन्यांच्या विश्वात असे चित्र सध्या पाहायला मिळते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘झी मराठी’ आणि ‘कलर्स मराठी’ या दोन आघाडीच्या वाहिन्यांमध्ये सध्या अशीच स्पर्धा सुरू झाली आहे. एकमेकांचे प्रेक्षक पळवण्याच्या आणि कार्यक्रमांची नक्कल करण्याच्या या स्पर्धेत कोणता कार्यक्रम अधिक ‘टीआरपी’ मिळवितो याकडे मनोरंजन विश्वाचे लक्ष लागले आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीकडून ‘सूर नवा ध्यास नवा’ या नव्या कार्यक्रमाच्या जाहिराती सुरू झाल्या. ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम ‘कलर्स मराठी’ने जाहीर केला आणि त्यापाठोपाठ लगबगीने ‘झी मराठी’ने आपल्या ‘सारेगमप’ची घोषणा केली. तर ‘झी मराठी’वरील ‘चला हवा येऊ दे’ हा कार्यक्रम तात्पुरता थांबवत आहोत, असे जाहीर झाले आणि पाठोपाठ ‘कलर्स मराठी’ने ‘तुमच्यासाठी काय पण’ हा नवा कार्यक्रम सुरू करण्याचे जाहीर केले आणि गुरुवारपासून हा कार्यक्रम सुरूही झाला. ‘कलर्स मराठी’ने सोमवार ते बुधवार या दिवशी ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रम सुरू केला. पाठोपाठ झी मराठीने सोमवार-मंगळवारी ‘सारेगमप’ सुरू केले. झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाने अमाप लोकप्रियता मिळविली. या  कार्यक्रमाच्या अल्पविरामाचा फायदा घेऊन कलर्स मराठीने सुरू केलेला ‘तुमच्यासाठी काय पण’ हा कार्यक्रम खरं तर ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाची नक्कल आहे. ‘तुमच्यासाठी काय पण’चा फायदा वाहिनीला किती व कसा होतो हे येणारा काळच ठरवेल. वेगवेगळ्या रिअ‍ॅलिटी शोमधून जे गायक-गायिका आता ‘मान्यवर’ झाले आहेत, अशा मंडळींना घेऊन त्यांच्यात स्पर्धा घेण्याची ‘सूर नवा ध्यास नवा’ची संकल्पना वेगळी आहे. त्याच वेळी झी मराठीचा ‘सारेगमप’ कार्यक्रम सुरू झाला आहे. मराठीतील संगीताच्या रिअ‍ॅलिटी शोला झी मराठीने ‘सारेगमप’च्या माध्यमातून एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. पुढे मराठी मनोरंजन वाहिन्यांवर तशाच प्रकारचे कार्यक्रम सादर झाले. मराठीत अशा शोचा पाया दूरदर्शनच्या सह्य़ाद्री वाहिनीववरील ‘ताक धिना धिन’ या कार्यक्रमाने घातला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. इतकेच कशाला खासगी मनोरंजन वाहिन्या जेव्हा सुरू झाल्या तेव्हा त्या प्रत्येक वाहिनीने मुंबई दूरदर्शनच्या अनेक कार्यक्रमांचीच अगदी सेम टू सेम नक्कल केली होती.‘तुमच्यासाठी काय पण’ कार्यक्रमातून मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रातील चित्रपट, नाटक आणि मालिकांची प्रसिद्धी केली जाणार आहे. निर्माते, कलाकार, दिग्दर्शक यांना आपली कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यासाठी ‘कलर्स मराठी’ वाहिनीने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता संदीप पाठक करणार असून यात योगेश शिरसाट, समीर चौगुले, अरुण कदम, भूषण कडू, हेमांगी कवी, ओंकार भोजने, किशोर चौघुले या कलाकारांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रमाची एवढी रूपरेषाही त्याची तुलना ‘चला हवा येऊ द्या’शी करण्यास पुरेशी आहे. तिथेही एकटी श्रेया बुगडे आहे इथेही एकच स्त्री व्यक्तिरेखा म्हणून हेमांगी कवी आहे. कार्यक्रमात नावीन्यता आणण्यासाठी काहीवेगळ्या गोष्टींचा समावेश करण्यात आला असल्याचा दावा वाहिनीकडून करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा सेट रेल्वे स्थानकाच्या स्वरूपात असून मनोरंजनाच्या या स्थानकावर कलाकार त्यांच्या कलाकृतीची प्रसिद्धी करणार आहेत त्याचे नाव ‘गाजावाजा स्टेशन’ असे ठेवण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या दोन भागांत ‘दशक्रिया’ हा मराठी चित्रपट आणि ‘गेला उडत’ नाटकाचा चमू प्रेक्षकांना भेटणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The competition between zee marathi and colors marathi tv for trp
First published on: 19-11-2017 at 02:10 IST