मराठी कलाविश्वात ९० चा काळ गाजवणारी अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. १९८७ साली ’राजलक्ष्मी’ या चित्रपटातून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या अश्विनी यांनी केवळ मराठीच नाही तर काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं. मात्र लग्नानंतर त्यांनी कलाविश्वापासून फारकत घेतली. विशेष म्हणजे कलाविश्वापासून त्या दूर जरी असल्या तरी त्यांची नाळ आजही या क्षेत्राशी जोडलेली आहे. त्यामुळे बऱ्याच वर्षानंतर त्या पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत.

अश्विनी यांना पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्याची चाहत्यांची प्रचंड इच्छा होती. मात्र त्या अमेरिकेत स्थायिक असल्यामुळे हे शक्य नव्हतं. परंतु चाहत्यांसाठी आणि अभिनयावर असलेल्या प्रेमाखातर त्यांची पावलं पुन्हा एकदा अभिनय क्षेत्राकडे वळली आहेत. त्यांनी ‘द रायकर केस’ या वेबसीरिजच्या माध्यमातून कलाविश्वात पुन्हा पदार्पण आहे. विशेष म्हणजे या सीरिजच्या माध्यमातून त्यांनी पहिल्यांदा वेबविश्वात पदार्पण केलं आहे.

‘द रायकर केस’ या सीरिजची कथा एका कुटुंबाभोवती फिरत असून यात सस्पेंस थ्रिलर मोठ्या प्रमाणावर आहे.  या सीरिजमध्ये त्या महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकल्या असून त्या साक्षी नायक रायकर या भूमिकेत झळकल्या आहेत. या सीरिजमध्ये त्यांच्यासोबत अनेक मराठी कलाकारही झळकले आहेत. अतुल कुलकर्णी, अजय पूरकर हे महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

दरम्यान, या सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांना पुन्हा एकदा प्रेक्षकांना अश्विनी यांचा अभिनय पाहण्याची संधी मिळाली. अश्विनी भावे यांनी वेबविश्वात जरी पहिल्यांदाच पदार्पण केलं असलं तरीदेखील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ’किस बाई किस’, ’अशी ही बनवाबनवी’, ’कळत नकळत’, ’झुंज तुझी माझी’, ’वजीर’ यांसारख्या चित्रपटात त्या झळकल्या.