यंदाच्या ७५व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात लैंगिक शोषणाचा मुद्दा प्रकर्षाने उठवण्यात आला. हॉलिवूड चित्रपट निर्माता हार्वी वाइनस्टीनवर काही अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. तेव्हापासून हा मुद्दा हॉलिवूडसोबतच बॉलिवूडमध्येही चर्चेत आला. लैंगिक शोषण करणाऱ्यांची वेळ संपली आहे, अशा शब्दांत हॉलिवूड अभिनेत्री ओपरा वीन्फ्रेने वाइनस्टीनवर निशाणा साधला. ‘सेसिल बी डीमिले’ हा लाइफटाइम अचिव्हमेन्ट अवॉर्ड ओपराला प्रदान करण्यात आला.

पुरस्कार स्विकारताना ओपराने तिच्या भाषणात हॉलिवूडमध्ये चर्चेत असलेल्या लैंगिक शोषणाचा मुद्दा उचलला. ‘शक्तिशाली पुरुषांच्या अत्याचाराविरोधात महिला सहजपणे व्यक्त होत नव्हत्या किंवा व्यक्त झाल्या तरी त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नव्हते. पण आता लैंगिक शोषण करणाऱ्यांची वेळ संपली आहे. आता असे वातावरण निर्माण झाले आहे, जिथे महिलांना #MeToo बोलण्याचा अधिकार आहे आणि पुरुष ऐकत आहेत. हा लढा फक्त हॉलिवूडपर्यंत मर्यादित नसून जगभरातील महिलांनी यात सहभाग घेतला आहे. त्या सर्व महिलांना मी सांगू इच्छिते की नवीन पहाट होणार आहे.’

वाचा : मातृत्वाच्या मुद्दयामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेली ऐश्वर्या ‘सरोगेट मदर’ची भूमिका साकारणार?

प्रसारमाध्यमांनीही याप्रकरणी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे तिने म्हटले. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने हार्वी वाइनस्टीनशी संबंधित लैंगिक शोषणाच्या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर सोशल मीडियावरही ‘मी टू’ #MeToo हा हॅशटॅग ट्रेण्डमध्ये आला होता. या हॅशटॅग मोहिमेतून लैंगिक अत्याचाराचा सामना कराव्या लागलेल्या अनेकांनी जाहीरपणे त्यांच्या भावना व्यक्त केल्या.