कॉमेडियन कपिल शर्माच्या करिअरचा आलेख पाहता पाहता असा उंचावला की अनेकांनाच त्याचा हेवा वाटू लागला. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये येणाऱ्या प्रत्येक कलाकारामुळे कपिलच्या यशात काही महत्त्वाचे क्षण आणि महत्त्वाची माणसं जोडली जाऊ लागली. पण, परिस्थिती नेहमीच एकसारखी असते असं नाही. कपिलच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं. सर्व गोष्टी इतक्या झपाट्याने बदलत गेल्या की खळखळून हसवणाऱ्या ‘द कपिल शर्मा शो’नेच प्रेक्षकांचा निरोप घेतला. हा कार्यक्रम ‘ऑफ एयर’ जाण्यामागे तशी बरीच कारणं आहेत. पण, त्यातही कपिलच्या काही चुकाच त्याला महागात पडल्याचं म्हटलं जातंय. चला जाणून घेऊया त्याच्या या चुका नेमक्या आहेत तरी काय…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१. सुनील ग्रोवरसोबत झालेला वाद- कपिल शर्मा शोमध्ये सुरुवातीपासूनच सुनील ग्रोवर हुकमी एक्का होता असं म्हणायला हरकत नाही. किंबहुना बरेच प्रेक्षक सुनीलच्या विनोदी अंदाजामुळेच या कार्यक्रमाला फॉलो करायचे. पण, एका विमानप्रवासादरम्यान या दोन्ही विनोदवीरांमध्ये झालेल्या वादानंतर होत्याचं नव्हतं झालं. सुनील ग्रोवर, अली असगर, सुगंधा मिश्रा यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला. त्यांच्यासोबतच प्रेक्षकांनीही कपिलच्या शोकडे पाठ फिरवली. आपल्या कार्यक्रमातील सर्व हुकमी एक्के निघून गेल्याचा सर्वात जास्त त्रास कपिललाच सहन करावा लागला.

२. कपिलचं मद्यपान- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कपिलला रात्री उशीरापर्यंत पार्टी करण्याची आणि वारंवार मद्यपान करण्याची फार सवय आहे. त्यामुळे त्याच्या कामामध्ये असणारी सुसूत्रता कुठेतरी हरवत चालल्याचं पाहायला मिळालं. मुख्य म्हणजे या सवयीचा परिणाम त्याच्या आरोग्यावरही झाला. ज्यामुळे वेळी अवेळी झोपणं, काही गोष्टींचा गरजेपेक्षा जास्त ताण घेणं यांचा सामना त्याला करावा लागला.

३. वारंवार रद्द होणारं चित्रीकरण- सेलिब्रिटींचं कपिलच्या शोवर येणं ही काही नवी बाब नाही. पण, गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रिटी आले आणि चित्रीकरण न करताच निघून गेले. हे असं अनेकदा घडलं होतं. सेलिब्रिटी सेटवर आलेले असतानाही कपिलचं वेळेत न पोहोचणं आणि वारंवार चित्रीकरण रद्द करणं अनेकांनाच खटकू लागलं. ज्यामुळे त्याच्या या वागण्याला ‘अनप्रोफेशनलिझम’चं नावही देण्यात आलं.

वाचा : अक्षयसोबत प्रियांकाचं नाव जोडताच ट्विंकलचा राग अनावर

४. एकाच वेळी अनेक काम करण्याचा निर्णय चुकला- कपिल शर्मा त्याच्या विनोदी कार्यक्रमासोबतच चित्रपटांच्या चित्रीकरणातही व्यग्र होता. ‘द कपिल शर्मा शो’ आणि ‘फिरंगी’ चित्रपटाचं चित्रीकरण एकाच वेळी सुरु असल्यामुळे कपिलला वेळेचं नियोजन करणं काही जमलं नाही. ज्यामुळे सगळाच गोंधळ झाला आणि परिस्थितीचा अंदाज येण्यापूर्वीच सर्व काही हाताबाहेर निघून गेलं होतं. ‘द कपिल शर्मा शो’चं बंद होणं अनेकांसाठी निराशाजनक असलं तरीही येत्या काळात नव्या जोमाने आणि नव्या संकल्पनेसह तो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: These 4 deadly mistakes comedian kapil sharma made that led to his the kapil sharma shows closure
First published on: 02-09-2017 at 13:16 IST