अभिनेत्री शिल्पा शेट्टी व काजोल यांचा एक वेगळाच चाहतावर्ग आहे. ‘बाजीगर’ या चित्रपटात दोघींनी एकत्र काम केलं होतं. शिल्पाने काजोलच्या बहिणीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. पण या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शिल्पा आणि काजोलमध्ये खटके उडाले. ‘सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन’वरील ‘सुपर डान्सर 3’ या शोमध्ये शिल्पाने स्वत: हा किस्सा सांगितला होता.

या रिअॅलिटी शोमध्ये गायक कुमार सानू यांनी हजेरी लावली होती. त्यावेळा साक्षीम व वैभव या स्पर्धकांच्या जोडीने ‘चुरा के दिल मेरा’ या प्रसिद्ध गाण्यावर नृत्य सादर केलं होतं. या गाण्यावरील परफॉर्मन्स पाहताना शिल्पा शेट्टीला या चित्रपटाशी संबंधीत किस्सा आठवला. हा किस्सा तिने प्रेक्षकांनाही सांगितला.

‘बाजीगर’ या चित्रपटातील ‘काली काली आँखे’ हे गाणे प्रचंड प्रसिद्ध झाले होते. हे गाणं चित्रपटाच्या टीमला प्रचंड आवडलं होतं. शिल्पाचा हा पहिलाच चित्रपट असल्याने ‘काली काली आँखे’ या गाण्यावर आपल्याला नृत्य करायला मिळावे असे तिला वाटत होते. “आम्ही बाजीगरसाठी शूटिंग करत होतो, तेव्हा मला ‘काली काली आँखे’ या गाण्याचा एक भाग व्हायचं होतं. परंतु माझ्याऐवजी काजोलवर हे गाणं चित्रीत करण्याचं ठरलं. त्यावेळी मला खूप राग आला होता. कारण काजोलचे डोळे काळे नसताना देखील काली काली आँखे तिच्यावर कसे चित्रीत होऊ शकते असा मला प्रश्न पडला होता,” असं शिल्पाने सांगितलं होतं.