हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून अधिराज्य गाजविणाऱ्या अभिनेता शाहरुख खानचा आज वाढदिवस. गेल्या कित्येक वर्षांपासून किंग खान या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शाहरुखचा आज स्वतंत्र चाहतावर्ग आहे. हॅण्डसम आणि तितकाच कूल दिसणारा शाहरुख शालेय जीवनामध्ये प्रचंड वेगळा दिसत होता. सध्या सोशल मीडियावर त्याचा एक जुना फोटो व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे त्याचा हा फोटो काही वर्षांपूर्वी त्याच्याच शाळेतील एका व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केला होता.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो त्याच्या शालेय जीवनातील असून शाळेच्या मासिकात शाहरुखचा फोटो छापण्यात आला होता. या फोटोमध्ये शाहरुख प्रचंड वेगळा दिसत आहे. इतकंच नाही तर हा फोटो पाहिल्यानंतर या फोटोतील शाहरुख आणि आता चित्रपटांतून दिसणारा शाहरुख यांमध्ये बराच फरक दिसत आहे.

दरम्यान, शाहरुखची लोकप्रियता त्यावेळी शाळेतदेखील तितकीच असल्याचं सांगण्यात येतं. गेल्या वर्षी शाहरुखचा ‘झिरो’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटानंतर तो एकाही चित्रपटामध्ये झळकला नाही. सध्या तो त्याचा जास्तीत जास्त वेळ आपल्या मुलांसोबत घालवत आहे.