दाक्षिणात्य सिनेसुपरस्टार पवन कल्याण याचा आज वाढदिवस आहे. पवनला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या काही चाहत्यांनी ४० फुट उंचीचे एक पोस्टर तयार केले होते. हे पोस्टर लावत असताना विजेचा झटका बसल्यामुळे तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. या मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना निर्माता बोनी कपूर यांनी आर्थिक मदत करण्याचं वचन दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आज आम्ही तीन प्रशंसक गमावले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सामील आहोत. या प्रतिकूल परिस्थितीत आम्ही चाहत्यांसोबत उभे आहोत. या अपघातात ज्या लोकांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना आम्ही प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत करत आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची ताकद मिळो.” अशा आशयाचे ट्विट करुन बोनी कपूर यांनी या दुर्घटनेबाबत माहिती दिली.

मंगळवारी चितूर जिल्ह्यातील कनमलदोड्डी गावात हा अपघात घडला. पवन कल्याणला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या गावात एक भले मोठे पोस्टर उभारले जात होते. हे पोस्टर लावत असताना तीन लोकांना विजेचा जबरदस्त झटका बसला. अचानक बसलेल्या झटक्यामुळे त्या तीन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला. या दूर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना व जखमींना मदत करण्याची जबाबदारी बोनी कपूर यांनी स्विकारली आहे. त्यामुळे त्यांचं सोशल मीडियाद्वारे कौतुक केलं जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three pawan kalyan fans die of electrocution while erecting banner for the actors birthday mppg
First published on: 02-09-2020 at 18:10 IST