खासकरुन आपल्या अॅक्शन सीनसाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे टायगर श्रॉफ. सोशल मीडियावर सक्रीय असलेला टायगर अनेकदा त्याच्या वर्कआऊट किंवा डान्सचे व्हिडीओ, फोटो शेअर करत असतो. मात्र, यावेळी त्याने त्याच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. टायगर लवकरच ‘गणपथ’ या चित्रपटात झळकणार आहे.

टायगरने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये पुन्हा एकदा त्याचा अॅक्शनपॅक अवतार पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या मोशन पोस्टरमध्ये टायगरचा एक डायलॉग सध्या सोशल मीडियावर गाजत आहे.”जब अपून डरता हैं ना, तब अपून बहोत मारता हैं”, असा डायलॉग टायगर म्हणताना दिसत आहे.

“मी आतापर्यंत केलेल्या चित्रपटांपेक्षा या चित्रपटाची कथा थोडी वेगळी आहे. या चित्रपटासाठी माझी, जॅकी भगनानी आणि विकास बहल यांच्यासोबत अनेकदा चर्चा झाली. मला चित्रपटाची कथा विशेष आवडली असून विकाससोबत काम करण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे”, असं टायगर म्हणाला.

दरम्यान, विकास बहल दिग्दर्शित ‘गणपथ’ या चित्रपटाचं चित्रीकण जून किंवा जुलै २०२१ मध्ये सुरु होणार असून हा चित्रपट २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या टायगरच्या नावावरचा पडदा जरी दूर झाला असला तरी त्याच्यासोबत अजून कोणते कलाकार झळकणार हे मात्र गुलदस्त्यात आहे.