वर्षाच्या अखेरीस बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खानने त्याच्या चाहत्यांसाठी मनोरंजनाचा विशेष डोस आणला. ‘एक था टायगर’चा सिक्वल असलेल्या ‘टायगर जिंदा है’ची भेट सलमानने चाहत्यांना दिली. विशेष म्हणजे त्याची ही भेट प्रेक्षकांनाही आवडल्याचे चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून कळते.

वाचा : पहाटे ३ पर्यंत चालणाऱ्या विरुष्काच्या रिसेप्शनमध्ये इतका खर्च होणार?

२२ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या ‘टायगर जिंदा है’ने केवळ तीन दिवसांतच १०० कोटींचा गल्ला पार केला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने ११४.९३ कोटींची कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी ३४.१० कोटी, शनिवारी ३५.३० कोटी आणि रविवारी तब्बल ४५.५३ कोटी रुपये इतकी विक्रमी करत चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला पार केला. ‘बॉलिवूड हंगामा’ या वेबसाइटने ही माहिती दिली आहे. अनेकांना ख्रिसमसची सुट्टी असल्याने आजच्या दिवशीही चित्रपट चांगली कमाई करण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून ‘टायगर जिंदा है’ १५० कोटींचा गल्ला पार करु शकतो.

वाचा : अक्षय- ट्विंकलच्या डान्सपासून वरुण धवनच्या अनोख्या शुभेच्छांपर्यंत बॉलिवूडचे ख्रिसमस सेलिब्रेशन

भारत-पाकिस्तान एकत्र येण्याचा प्रसंग हा या चित्रपटात शंभर टक्के यशस्वी ठरल्याचे चित्रपट समीक्षकांचे म्हणणे आहे आणि त्याचे श्रेय दिग्दर्शक अली अब्बास जफरला नक्कीच जाते. यशराजचा बिग बजेट चित्रपट आणि सलमानला असलेली हिटची गरज या दोन्हीची कावड अंगावर घेत ते पेलून धरत एक संपूर्ण मसालापट दिग्दर्शकाने दिला आहे. या क्षणाला निदान सलमानबरोबर त्याच्या चाहत्यांनाही अशाच चित्रपटाची गरज होती असे म्हणण्यास हरकत नाही.