आतापर्यंत संपूर्ण जगभरात जेवढी युद्ध झाली ती सगळीच प्रसारमाध्यमांसमोर आली होती. यातली काही युद्ध अशी होती जी कोणीही विसरु शकत नाही. युद्धात शहीद झालेल्या जवानांना आपण आजही विसरु शकत नाही. पण त्यात असेही काही शूरवीर आहेत, त्यांच्या कतृत्वाबद्दल आपल्याला काहीच माहित नाही, असेही काही पुरुष आणि महिला आहेत ज्यांनी देशासाठी वीरमरण पत्करले पण ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहीत नाही. गाझी अटॅक ही भारत- पाकिस्तानमध्ये लढल्या गेलेल्या युद्धाची आणि शहीदांची गोष्ट आहे. या सिनेमात राणा डगुबत्ती, तापसी पन्नू यांच्या मुख्य भूमिका आहेत. तसेच ओम पुरी यांचीही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने आणि एए फिल्म्स यांनी संयुक्तपणे या सिनेमाची निर्मिती केली आहे. ही भारताची पहिली सागरी लढाई होती. या लढाईबद्दल कोणालाच काही माहित नाही कारण ही एक गुप्त मोहीम होती. ही मोहीम १९७१ मध्ये भारतीय पाणबुडी एस-२१ मधील त्या जवानांची आहे, ज्यांनी पाकिस्तानच्या पीएनएस गाझी पाणबुडीपासून भारताच्या आयएनएस विक्रांतला बुडण्यापासून वाचवले होते. याशिवाय या जवानांनी विशाखापट्टणमला पाकिस्तानच्या ताब्यात जाण्यापासूनही वाचवले होते. ही कथा १८ दिवस पाण्याखाली घालवलेल्या त्या नौदल अधिकाऱ्याच्या टीमची आहे.

https://twitter.com/karanjohar/status/819017380072452096

भारतीय नौदल दिवसाचे औचित्य साधून निर्मात्यांनी या सिनेमाचा पहिला लूक प्रदर्शित केला होता. सिनेमाच्या प्रमुख पात्रांना या पोस्टरमध्ये दाखवण्यात आले होते. या नौदलच्या टीममध्ये के.के. मेननचाही सहभाग आहे. करण जोहरने या सिनेमाबद्दलचे ट्विट करताना म्हटले की, द गाझी अटॅक हा सिनेमा १७ फेब्रुवारी २०१७ ला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात राणा एका नौदल अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसेल तर तापसी निर्वासिताची भूमिका साकारत आहे. सध्या हा सिनेमा पोस्ट प्रोडक्शनमध्ये तयार होत आहे. १७ जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. करणने अजून एक ट्विट करत म्हटले होते की, ‘एक न बघितलेली लढाई, एक अशी लढाई जिच्याबद्दल तुम्ही जाणून घेतले पाहिजे.’