झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’च्या १८ ऑगस्ट रोजी प्रसारित होणाऱ्या भागात दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांचा जागर करण्यात येणार आहे. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी ‘रिंगणनाटय़’या चळवळीच्या माध्यमातून मारेकऱ्यांचा निषेध करणे, डॉ. दाभोलकर यांचा विचार समाजात पोहोचविणे हे काम सुरू ठेवले आहे. िरगणनाटय़ाचा प्रसार आणि डॉ. दाभोलकर यांना आदरांजली म्हणून ‘चला हवा येऊ दे’चा भाग त्यांना समर्पित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात रिंगणनाटय़ाची संकल्पना मांडणारे दिग्दर्शक अतुल पेठे, डॉ. दाभोलकर यांचे पुत्र डॉ. हमीद दाभोलकर व कन्या मुक्ता दाभोलकर सहभागी होणार आहेत. कार्यक्रम मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता प्रसारित होणार आहे.
अतुल पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात कार्यशाळा घेण्यात आल्या. यातून १६ गट तयार करण्यात आले. विविध गावांमध्ये या गटांकडून प्रयोग करण्यात येत असून इस्लामपूर येथील गटाने ‘सॉक्रेटिस ते दाभोलकर व्हाया तुकाराम’ हे रिंगणनाटय़ बसविले आहे. पुणे, मुंबई, दिल्ली येथे त्याचे प्रयोग झाले असून ‘चला हवा येऊ द्या’मध्ये त्याची छोटी झलकही सादर करण्यात येणार आहे. पेठे यांच्यासह डॉ. हमीद व मुक्ता या नाटय़ चळवळीबाबत माहिती देणार असून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या आठवणींनाही उजाळा देणार आहेत.