ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला सलमानचा ‘ट्युबलाइट’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नाही. प्रेक्षक-समीक्षकांकडून चित्रपटासाठी संमिश्र प्रतिसाद मिळाला. अद्यापही हा चित्रपट १०० कोटींच्या आकड्यापर्यंतही पोहोचला नाही. त्यामुळे दिग्दर्शक कबीर खान आणि सलमानची जोडी यावेळी कमाल करू शकली नाही असंच म्हणण्यात येतंय. मात्र या सर्व गोष्टी बाजूला सारत दिग्दर्शक कबीर खान आणि सलमान खान पुन्हा एकदा एकत्र चित्रपट बनवणार असल्याची चर्चा आहे.

‘डेक्कन क्रोनिकल’ या वृत्तपत्राच्या माहितीनुसार समीक्षकांच्या टीकांचा सलमान फारसा विचार करत नाही. वेगवेगळ्या भूमिका साकारण्याची सलमानची इच्छा आहे. समीक्षकांच्या भीतीशिवाय अभिनय क्षेत्रात आपले काम करत जावे, हाच त्याचा स्वभाव आहे. ‘ट्युबलाइट’च्या चित्रीकरणादरम्यान कबीर खान आणि सलमानमध्ये पुढच्या चित्रपटाविषयी बोलणी झाली आणि त्याबाबत अजूनही दोघांचा निर्णय कायम आहे.

वाचा : …या सेलिब्रिटी जोडप्यांच्या घरी होणार नव्या पाहुण्यांचे आगमन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सलमानच्या घरी झालेल्या ग्रॅण्ड ईद पार्टीदरम्यानही कबीर खानने यासंदर्भात त्याला पुन्हा एकदा विचारल्याचं म्हटलं जात आहे आणि सलमानने कबीरला यावेळीसुद्धा होकार दिला आहे. त्यामुळे ‘एक था टायगर’, ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘ट्युबलाइट’नंतर आता कबीर खान आणि सलमान खानची जोडी पुन्हा एकदा नवीन चित्रपटासाठी एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटाच सलमान कोणती भूमिका साकारणार हा सहाजिक प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झालाय. तर सलमान त्याच्या पुढील चित्रपटात ७५ वर्षीय वृद्धाची भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे चित्रपटाबद्दल आणखीनच उत्सुकता लागून राहिली आहे. चित्रपटाचे नाव अद्याप कळाले नसले तरी याबद्दल अधिकृत माहिती दिग्दर्शक कबीर खान आणि सलमान लवकरच प्रेक्षकांना देतील अशी अपेक्षा आहे.