बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा आगामी सिनेमा ‘ट्युबलाइट’ गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. सलमानचे चाहते त्याच्या या सिनेमाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. ‘ट्युबलाइट’चा दिग्दर्शक कबीर खानने एक ट्विट करत सिनेमाला ‘यू’ सर्टिफिकेट मिळाल्याचे सांगितले.

या ट्विटसोबत त्याने सिनेमाचा ट्रेलर २५ मे रोजी प्रदर्शित होणार असेही सांगितले. ट्रेलर यायला वेळ असला तरी प्रेक्षकांसाठी ‘ट्युबलाइट’च्या टीमने मेकिंग टिझर प्रदर्शित केला आहे. यात सलमानची माटिन रे तंगू या बालकलाकारासोबत चांगलीच गट्टी जमलेली दिसत आहे. मेकिंगच्या या टिझरमध्ये अनेक वेळा सलमान आणि माटिन दंगा मस्ती करताना दिसतात. या व्हिडिओला ‘ट्यूबलाइट की मेकिंग का टीजर’ असे नाव दिले आहे.

या टिझरमध्ये सलमानचे आयुष्य ज्या व्यक्तींभोवती फिरते त्यांच्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. ट्युबलाइटचा भाऊ, ट्युबलाइटचा मित्र आणि ट्युबलाइटचा दिग्दर्शक अशी पात्र या टिझरमध्ये दिसतात.

सलमान आणि कबीर तिसऱ्यांदा एकत्र काम करत आहेत. याआधी या जोड गोळीने ‘एक था टायगर’ आणि ‘बजरंगी भाईजान’ या सुपर हिट सिनेमांमध्ये एकत्र काम केले होते. या दोघांचा हा तिसरा सिनेमा असल्यामुळे या सिनेमात आता वेगळं काय पाहायला मिळेल याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सिनेमाचे ‘रेडिओ’ हे गाणे याआधीच प्रदर्शित झाले असून अनेकांच्या प्ले- लिस्टचे महत्त्वाचे गाणे बनले आहे. कबीर खानने दुबईमध्ये हे गाणे एका ग्रॅण्ड इव्हेंटमध्ये प्रदर्शित केले होते.