असे म्हटले जाते की मनुष्याच्या जोडीदाराची गाठ स्वर्गात ब्रह्मदेवाकडून बांधली जाते. परंतु लग्न प्रकारातील प्रेमविवाहाच्या गाठी या ज्याच्या त्याने प्रेमानेच बांधाव्या लागतात. लग्नाआधी एकमेकांशी कायम प्रेमाने वागण्याच्या, कायम सोबत देण्याच्या, कधीही न भांडण्याच्या आणाभाका केल्या जातात. पण, लग्न झाल्यानंतर काही काळ लोटला की या ‘प्रेमविवाह’ या शब्दातील केवळ ‘विवाह’ हाच शब्द शिल्लक राहतो आणि प्रेमाचा गोडवा हळू हळू आटू लागतो. अशाच हलक्याफुलक्या वादाची आणि प्रेमाच्या नात्याची गोष्ट प्रेक्षकांना झी मराठीच्या ‘तुझं माझं ब्रेकअप’ या मालिकेमधून पाहायला मिळत आहे.

मालिकेतील समीर आणि मीरा या दोन युवकांचे प्रेम महाविद्यालयाच्या बाकावरून बागेच्या बाकापर्यंत येऊन पोहोचते. धनाढय़ देसाई कुटुंबाचा एकुलता एक समीर व मध्यमवर्गीय कुटुंबातील शिस्तबद्ध मीरा असे हे जोडपे दोन्ही घराण्याच्या संमतीने प्रेमविवाह करतात. लग्नाआधी एकमेकांच्या अवगुणांवर पडदा टाकणारे हे दोघे लग्नानंतर कोणताही आडपडदा न ठेवता एकमेकांच्या चुका काढून भांडायला लागतात. लग्नाआधी एकमेकांचा दुरावा सहन न करणाऱ्या या जोडप्याचा प्रवास दोघांच्या वेगळं होण्यापर्यंत येऊन पोहोचतो. तरुणाईच्या मनोवृत्तीवर भाष्य करणाऱ्या या मालिकेतील ‘समीर’ची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता साइंकित कामत म्हणाला, झी मराठी या वाहिनीवरील पहिली मुख्य व्यक्तिरेखा साकारायला खूप छान वाटत आहे. कारण, मी आजच्या तरुणाईची होणारी घालमेल सादर करतो आहे. लग्न झाल्यावर ज्याची अजिबात सवय नसते अशा काही सांसारिक जबाबदाऱ्या अचानक अंगावर येतात. लग्न झाल्यावरचं वय हे मजामस्ती करण्याच असतं. पण तसं न होता, व्यवसाय सांभाळून घरच्या जबाबदाऱ्यांना व परिस्थितीला तोंड द्यावं लागतं. तेव्हा खासकरून मुलांची खूप जास्त गोची होते व त्यामुळे घालमेल वाढते. ही घालमेल तो कोणाला सांगू शकत नाही व दाखवूही शकत नाही. या सगळ्यामुळे नात्यामध्ये अढी निर्माण होते. खूप जास्त गैरसमज निर्माण होतात आणि गैरसमज वाढल्यावर स्फोट होतो तो ब्रेकअपचा.

मालिकेत ‘मीरा’ची भूमिका करणारी अभिनेत्री केतकी चितळेने तिच्या भूमिकेविषयी सांगितले, मीरा ही आजच्या युगात वावरणारी एक स्वावलंबी मुलगी आहे. ऑनलाइन शॉपिंग केल्याशिवाय तिचा वीकेंड पूर्ण होत नाही. आपण पैसे कमवून ते उधळायचे नाहीत पण खर्च केले पाहिजेत अशा वेगळ्या विचारांची मीरा आहे. मीराला पसारा घातलेला अजिबात आवडत नाही. पण लग्न झाल्यावर तिच्या असं लक्षात येतं की तिचा नवरा खूप पसारा घालतो. या आणि अशा अनेक छोटय़ामोठय़ा गोष्टींवरून त्या जोडप्यांत वाद होतात. आणि वादाचे टोक घटस्फोटापर्यंत जाते. ती तिच्या माहेरच्या लोकांना काहीही कल्पना न देता घटस्फोटाचा अर्ज करून सासर सोडून माहेरी निघून येते. अशा आजच्या युगातल्या उतावीळ मनोवृत्तीच्या मुलीची ही भूमिका आहे.मालिकेचे शीर्षक गीतही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आले आहे. ‘टॉप मोशन अ‍ॅनिमेशन’ तंत्राचा वापर यात करण्यात आला आहे. शीर्षक गीतातील कलाकारांना आडवे झोपवून हा अ‍ॅनिमेशन प्रकार चित्रित केला जातो. कलाकार आडवे झोपलेले असतात पण व्हिडीओमध्ये ते उभे राहून सर्व कृती करत आहेत असा भास होतो. हीच या प्रकारची खरी गंमत आहे. झी मराठीवर पहिल्यांदा हा वेगळाप्रकार ‘तुझं माझं ब्रेकअप’च्या शीर्षक गीतातून करण्यात आला आहे.  या चित्रीकरणाच्या वेळची गंमत सांगताना साइंकित म्हणाला, हा वेगळा प्रकार सर्वप्रथम आम्हाला करायला मिळणार म्हटल्यावर मी आणि केतकी आम्ही दोघेही हे तंत्र अनुभवण्यासाठी खूप आतूर होतो. पण चित्रीकरण झोपून होणार आहे व आपल्याला हावभाव व कृती या उभे राहून करत आहोत याचा आभास निर्माण करायचा आहे, असे जेव्हा कळले तेव्हा मात्र आमचा चेहरा बघण्याजोगा झाला होता. दोन दिवस याचे चित्रीकरण करण्यात आले. आमची पाठ, कंबर, मान पुढे अनेक दिवस दुखत होती. हा त्रास सहन केला पण त्याचे फळ चांगले मिळाले आहे. ‘तुझं माझं ब्रेकअप’ या मालिकेत रोहिणी हट्टंगडी, उदय टिकेकर, विजय निकम, राधिका हष्रे, संयोगिता भावे, रेश्मा रामचंद्र, उमेश जगताप, मधुगंधा कुलकर्णी आदी अनुभवी कलाकारांची फौजही बघायला मिळणार आहे. सोमील क्रिएशन्सची निर्मिती असलेल्या या मालिकेचं दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे आहे. मालिकेची कथा शेखर ढवळीकर, पटकथा चिन्मय मांडलेकर यांची आहे तर संवाद मुग्धा गोडबोले यांनी लिहिले आहेत.