रेश्मा राईकवार

तुंबाड

Make Home Made Gudi Padwa special Instant Sevai Kheer Note the Tasty Recipe
गुढीपाडव्या निमित्त बनवा स्पेशल स्वादिष्ट ‘शेवयाची खीर’ ; नोट करा रेसिपी
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
prashant damle birthday special article
प्रशांत दामले : ‘बेस्ट’मध्ये नोकरी ते रंगभूमीचा ‘विक्रमादित्य’, व्यवहार कुशल निर्मात्याचा बहुरुपी प्रवास
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

एखादीच दंतकथा, लोककथा मनात घर करून बसते. ती सांगताना जशी आपल्या मनासमोर उभी राहिली तशीच ती सगळ्यांना दिसली पाहिजे, असा ध्यास घेऊन त्यात रंग भरत अगदी जणू समोर घडते आहे इतक्या रसरशीतपणे ती आपल्यासमोर उतरावी, असा काहीसा अचंबित करणारा चित्रानुभव राही अनिल बर्वे दिग्दर्शित ‘तुंबाड’ हा चित्रपट देतो. चित्रानुभवच म्हणायला हवा कारण खूप सुंदर सुंदर चित्रे एकापाठोपाठ एक समोर ठेवली तर जशी मनाची अवस्था काय होईल, तशा तुंबाड पाहताना कित्येक फ्रेम्स स्वतंत्रपणे लक्षात राहतात. जणू त्या फ्रेममधून आणखी काही गोष्टी बाहेर पडतील की काय, पण.. हा ‘पण’ जास्त महत्त्वाचा आहे. कारण इतका नितांतसुंदर चित्रपट मुळात एक थरारपट आहे, गूढपट आहे. त्या गुढाच्या वलयात लपेटलेली ही गोष्ट तरीही एक शाश्वत सत्य इतक्या प्रभावीपणे समोर ठेवते की त्याला नाकारताच येऊ नये.

नारायण धारप यांच्या कथेवरून प्रेरणा घेऊन दिग्दर्शक राही अनिल बर्वे, मितेश शहा, आदेश प्रसाद आणि आनंद गांधी या चार जणांनी तुंबाडची पटकथा लिहिली आहे. या चौघांचा आणि पटकथेचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. एक दंतकथा इतक्या प्रभावीपणे चित्रभाषेत लिहिली गेली आहे की त्यात कलाकारांनी त्यांना नेमून दिलेली भूमिका केली तरी त्याचा पाहणाऱ्यावर तितकाच खोल परिणाम होतो. एखाद्या कादंबरीसारखीच या चित्रपटाची सुरुवात आहे. तीन प्रकरणांमध्ये ही कथा उलगडत जाते. त्यातल्या पहिल्या टप्प्यात शाप म्हणून कायम डोक्यावर कोसळणारा पाऊस घेऊन उभे राहिलेले तुंबाड गाव आपल्याला दिसते. आकाशातून कोसळणाऱ्या शापरूपी धारा आणि खाली खोल मातीत देवीच्या गर्भात अडकलेला हस्तर नावाचा सैतान. या दोघांच्याही छायेत वावरणारा लहानगा विनायक. त्याच्या मनात वाडय़ात दडलेल्या खजिन्याचा लोभ बीज धरून आहे. त्याच्या मनात शिरलेल्या या लोभाचा विषवृक्ष होऊ नये म्हणून त्याची आई त्याला तुंबाडपासून दूर नेते खरी.. मात्र मागे उरलेले एकाकी घर, त्यात खंगत जगणारी कु रूप म्हातारी आणि तिच्याकडे दडलेले खजिन्याचे सत्य या तिन्ही गोष्टी विनायकची पाठ सोडत नाहीत.

विनायकचे पुन्हा तुंबाडला येणे, खजिन्याचा शोध आणि त्यातून पुन्हा एकदा हस्तरप्रमाणेच लोभाच्या डोहात खोल खोल बुडत चाललेला विनायक सतत आपल्याला दिसत राहतो. ही गोष्ट विनायकपर्यंत संपत नाही. मोहाचा तोच वारसा त्याच्या मुलापर्यंतही पोहोचतो. याचा शेवट नकळतपणे आपल्याही डोळ्यात पाणी आणतो. लोभ हा वाईट हे कितीही लहानपणापासून कानावरून गेले असले तरी ते गोष्टीतून ज्या पद्धतीने दिग्दर्शक तुमच्यासमोर रंगवतो त्याला तोड नाही.

खूप दिवसांनी असा एक चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे जिथे पटकथा, दिग्दर्शनाची मांडणी, कथेनुसार उभारण्यात आलेले सेट्स, कथेचा म्हणून जो अवकाश उभा केला आहे त्यातली प्रत्येक गोष्ट बारकाईने आणि देखणेपणाने टिपणारा कॅ मेरा, व्हीएफएक्स, संकलन ही प्रत्येक तांत्रिक गोष्ट वरचढ ठरली आहे. अनेक रंग कॅ नव्हासवर एकत्र येत सहज एकमेकांत मिसळून जावेत आणि त्यातून सुंदर चित्र आकाराला यावे तसा हा चित्रपट आपल्यासमोर घडत जातो.

एकोणिसाव्या शतकाचा अगदी सुरुवातीचा काळ, तो हुबेहूब रंगवणे हेही एक आव्हान होते जे दिग्दर्शकाने पेलले आहे. हस्तरची काल्पनिक गोष्ट उभी करताना थेट देवीच्या गर्भाशयात उतरलेला विनायक दिसतो. हे गर्भाशय असेल किंवा वर्षांनुवर्षे अमरत्वाचा शाप घेऊन एकाकी धडधडत राहिलेल्या म्हातारीचे हृदय, जिचा देहही मातीत संपला आहे. तिच्या जिवंत असण्याची ती एकच खूण म्हणून ते वेलींच्या वेटोळ्यात अडकलेले हृदय असेल हे नितीन झिहानी चौधरी आणि राकेश यादव यांनी अप्रतिम उभे केले आहेत. पंकज कुमार यांचा कॅमेरा कितीतरी गोष्टी टिपत राहतो. कथेची गरज म्हणून शोधलेले निर्जन स्थळ, उभारलेला वाडय़ाचा सेट, नैसर्गिक प्रकाशात केलेले चित्रीकरण या सगळ्यामुळे कथेत असलेला गूढपणा आपोआप पडद्यावर जाणवायला लागतो.

यातले काही प्रसंग खरोखर अंगावर काटा आणतात. तांत्रिक बाबीला अनुसरून सोहम शाह, अनिता दाते केळकर, ज्योती मालशे, दीपक दामले प्रत्येकाने आपली व्यक्तिरेखा अचूक उभी केली आहे. सोहम शाहला कुठेही मराठी संवाद नसले तरी त्याच्या उच्चारात, देहबोलीत विनायक म्हणून जे मराठमोळेपण हवे ते उभे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्याने केला आहे. मात्र उत्तरार्धात विनायकच्या मुलाच्या भूमिकेत येणारा मोहम्मद समाद हा बालकलाकार चांगलाच लक्षात राहतो.

नारायण धारप यांच्या गूढक थेवरून हा चित्रपट प्रेरित असला तरी दिग्दर्शक म्हणून राही अनिल बर्वे यांच्या कल्पनेतून उभी राहिलेली तुंबाडची ही चित्रकथा खऱ्या अर्थाने एका काल्पनिक विश्वात घेऊन जाते. विनायकच्या मनात शिरून आपण थेट हस्तपर्यंत पोहोचते आणि तितक्याच सहजतेने शेवटाकडे येताना विनाशाचे ते मोहाच्या चावीने उघडलेले दार घट्ट बंद क रून टाकते.

* दिग्दर्शक- राही अनिल बर्वे

* कलाकार- सोहम शाह, अनिता दाते केळकर, ज्योती मालशे, दीपक दामले, मोहम्मद समाद