नवीन वर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु आहे. त्याचसोबत सरत्या वर्षाच्या चांगल्या आठवणींनाही उजाळा दिला जातो. अभिनेता संदीप पाठकसाठीसुद्धा हे वर्ष अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरलं. त्याचप्रमाणे या वर्षाच्या वारीमध्ये त्याच्या तीन महत्त्वाच्या इच्छा पूर्ण झाल्याचे त्याने सांगितले.

‘२०१७ हे वर्ष माझ्यासाठी खूपच महत्वपूर्ण ठरलं. या वर्षाच्या खूप आठवणी आहेत, खूप महत्वाच्या घटना आहेत. या वर्षाच्या वारीमध्ये माझ्या तीन महत्वाच्या इच्छा पूर्ण झाल्या. माझ्या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीमध्ये मी कधीच कुठल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले नव्हते. या वर्षी मी कॉमेडीची GST एक्स्प्रेस आणि सध्या सुरु असलेला आणि प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत असलेला ‘तुमच्यासाठी काय पन’ या दोन कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी मला मिळाली आणि माझी बऱ्याच वर्षांपासूनची अपुरी इच्छा पूर्ण झाली,’ असे तो म्हणाला.

वाचा : अखेर अजय देवगणला त्याचे रामदेव बाबा सापडले

‘तसेच एकदातरी पंढरपूरच्या वारीला जाण्याची संधी मिळावी असे माझे स्वप्न होते. तेदेखील पूर्ण झाले आणि ही वारी म्हणजे आठवणीतला ठेवा असे मी म्हणेन. ‘व-हाड निघालंय लंडनला’ या आमच्या नाटकाचा मुंबईकरांनादेखील आस्वाद घेता यावा अशी माझी तिसरी इच्छा होती. प्रशांत दामले यांच्या पाठिंब्यामुळे तीसुद्धा पूर्ण होऊ शकली,’ असे संदीपने म्हटले. त्याचसोबत नवीन वर्षात आणखी एखादं नाटक करण्याची इच्छा संदीपने व्यक्त केली.