‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेद्वारे फार कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता हार्दिक जोशी लवकरच नकारात्मक भूमिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘चालतंय की…’, असं म्हणणाऱ्या राणाची खलनायकी भूमिका पाहण्यासाठी सध्या प्रेक्षकांमध्येही उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका आणि ‘अंजली बाई’, ‘राणा’जींची निरागस प्रेमकथा ज्या पद्धतीने मालिकेद्वारे हाताळण्यात आली आहे त्याची खरंच दाद द्यायला हवी. सध्या ही मालिका एका महत्त्वाच्या वळणावर आली आहे. राणा आणि अंजलीच्या नात्याला आता एक नवे नाव मिळाले आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने मालिकेचे कथानक रंगत जाणार आहे.
या मालिकेत राणाच्या भूमिकेद्वारे अभिनेता हार्दिक जोशीने त्याचा चाहता वर्ग निर्माण केला आहे. भोळाभाबडा, कोणाच्याही वाईटाचा विचारही मनात न आणणारा, सतत हसऱ्या चेहऱ्याने परिस्थितीला सामोरा जाणारा हा ‘राणा’ लवकरच ‘जर्नी प्रेमाची’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये तो खलनायकी भूमिकेत दिसणार असल्यामुळे राणाच्या म्हणजेच हार्दिकच्या अभिनयाचा अणखीन एक पैलू प्रेक्षकांना पाहता येणार आहे. त्यामुळे आता हार्दिक जोशी या खलनायकी भूमिकेला न्याय देणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान, ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेविषयी बोलायचे झाले तर टीआरपीच्या क्रमवारीतही या मालिकेने इतर मालिकांना मागे टाकले आहे. अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांच्या अभिनय कौशल्याने त्यांना अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणाच्या प्रेमात सध्या कोल्हापूरकर पडले आहेत हे आता सर्वांनाच ठाऊक आहे. राणाचा तरुणाईवर इतका प्रभाव पडला आहे की गडहिंग्लज तालुक्यातील गेली १५ वर्षे बंद पडलेल्या व्यायामशाळा नव्या जोमाने सुरू झाल्या असल्यामुळे हे या मालिकेचे यशच म्हणावे लागेल.