लॉकडाउनमुळे घरात अडकलेल्या नागरिकांच्या मनोरंजनासाठी दूरदर्शन वाहिनीवर ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिका पुन्हा प्रसारित करण्यात आल्या आहेत. लोकाग्रहास्तव सुरु करण्यात आलेली ‘रामायण’ ही मालिका पहिल्याच आठड्यात टीआरपीमध्ये प्रथम स्थानावर होती. विशेष म्हणजे या मालिकेचा प्रत्येक भाग पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर असतात. मात्र रविवारी (१२ एप्रिल) प्रसिद्ध गायक सोनू निगममुळे ‘रामायण’ सुरु होण्यास १५ मिनीटे उशीर झाल्याने सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडल्याचं पाहायला मिळालं.

‘रामायण’ ही मालिका सकाळी आणि संध्याकाळी ९ वाजता प्रसारित केली जाते. मात्र अलिकडेच संध्याकाळी ९ च्या वेळेमध्ये ‘रामायण’ऐवजी दूरदर्शनवर ‘संगीत सेतू’ हा कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक सोनू निगम गाणं सादर करत होता. विशेष म्हणजे ‘रामायण’च्या वेळेत अन्य दुसरा कार्यक्रम पाहिल्यामुळे नेटकऱ्यांनी भन्नाट मीम्स व्हायरल केले.

पंतप्रधान सहाय्यता निधीत आर्थिक मदत करण्यासाठी दूरदर्शनने ‘संगीत सेतू’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात दुबईवरुन लॉइव्हच्या माध्यमातून सोनू निगम सहभागी झाला होता.

विशेष म्हणजे संध्याकाळी ‘रामायण’पूर्वी ‘संगीत सेतू’ हा कार्यक्रम दाखविला जाईल अशी माहिती दूरदर्शनने ट्विट करुन दिली होती. मात्र तरीदेखील काहींनी मीम्स शेअर केले.

दरम्यान, ‘रामायण’ पाहण्यासाठी दररोजप्रमाणे प्रेक्षक टीव्हीसमोर बसले मात्र टीव्हीवर ‘रामायण’ऐवजी ‘संगीत सेतू’ सुरु होतं. प्रेक्षकांनी काही वेळ वाट पाहिली आणि त्यानंतर मीम्स सुरु केले. मात्र ९.१५ मिनीटांनी ‘रामायण’ सुरु झालं.