फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत झालेल्या दंगलप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने JNU चा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद याला अटक केली आहे. बेकायदा कृत्यरोधी कायद्यांतर्गत (UAPA) उमर खालिदला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईवर अभिनेते प्रकाश राज यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “लज्जास्पद, आपण या विच हंट विरोधात आवाज उठवायला हवा.” अशा आशयाचं ट्विट करुन त्यांनी उमर खालिदला पाठिंबा देण्याची विनंती आपल्या चाहत्यांना केली आहे. प्रकाश राज यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

इंडियन एक्स्प्रेसला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी उमर खालिदला चौकशीसाठी बोलवले होते. रविवारी लोदी कॉलनीमध्ये त्याला विशेष सेल कार्यालयात तपासासाठी सहभागी होण्यास सांगितलं. त्यानंतर रविवारी तब्बल ११ तासांच्या चौकशीनंतर उमर खालिदला दिल्ली पोलिसांनी अटक केली.

उमर खलिद आणि वाद?

उमर खलिद याने मोदी सरकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर वेळोवेळी बोचरी टीका केली आहे. तसेच जेएनयूत हिंदू देवी- देवतांचे आक्षेपार्ह चित्र लावून तेढ निर्माण केल्याचा आरोप खलिदवर झाला होता. तसेच अफझल गुरुला फाशी देण्यात आली त्या दिवशी जेएनयूत शोकसभा झाली होती. यातही खलिद सहभागी झाल्याचे सांगितले जाते. याशिवाय खलिदने वेळोवेळी काश्मीरला स्वातंत्र्य देण्याची मागणी केली आहे.