रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका लॉकडाउनमुळे पुन्हा प्रकाशझोतात आली. अनेक वर्षांनंतर आजही या मालिकेची लोकप्रियता टिकून आहे. मालिकेतील कलाकार व शूटिंगदरम्यानचे किस्से सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पौराणिक मालिकेविषयी व त्यातील कलाकारांविषयी जाणून घेण्यास चाहते फार उत्सुक आहेत.
‘रामायण’ मालिकेत सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी काही वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, “जेव्हा मालिका सुरू झाली होती, तेव्हा मी अवघी पंधरा वर्षांची होते. त्यावेळी या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती की पुढे जाऊन ही मालिका एक वेगळाच इतिहास रचणार आहे.” शूटिंगबद्दल सांगताना त्यांनी पुढे म्हटलं, “रामचरितमानसमध्ये तुलसीदास यांनी राम आणि सीता यांच्या वेशभूषेचं वर्णन केलं होतं. आम्हाला त्याच प्रकारे वेशभूषा करायची होती. टेलिव्हिजनवर पहिल्यांदा रामायण पाहिलं जात होतं. त्यावेळी टीव्हीवर काम करण्याला फार काही महत्त्व नव्हतं.”
या मालिकेचा पहिला एपिसोड एक तासाचा होता आणि त्या एक तासाच्या शूटिंगसाठी तब्बल १५ दिवस लागले होते. शूटिंगसाठी सर्व कलाकार महिन्यातील २७ दिवस तिथेच राहायचे. सेटवरच मेकअप स्टुडिओ असायचा. शूटिंग झाल्याशिवाय कोणीच मुंबईला परतायचे नाही, असं त्यांनी सांगितलं.
“सहा महिन्यांतच आपण खूप मोठे स्टार झालो होतो, याची जाणीव झाली होती. त्यावेळी राम आणि सीता या भूमिका एखाद्या महाराजा आणि महाराणीसारख्या समजल्या जायच्या. आम्ही जगभरात मालिकेला प्रमोट केलं होतं. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी आमचा सत्कार करण्यासाठी दिल्लीला बोलावलं होतं. त्यावेळी टीव्ही म्हणजे एक धार्मिक स्थळ भासत होते आणि दर रविवारी सकाळी लोक त्यापुढे जमायचे. आम्ही जिथेही जायचो, तिथे लोक आमच्या पाया पडू लागले”, अशा शब्दांत त्यांनी अनुभव सांगितला.
इतक्या वर्षांनंतरही ‘रामायण’ ही मालिका लोकप्रिय असून लॉकडाउनच्या काळात ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे.