मिस युनिव्हर्स २०२१ चा किताब जिंकत देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या हरनाझ संधूचं नाव सोशल मीडियावर सातत्यानं चर्चेत आहे. हरनाझ देखील सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. हरनाझनं वयाच्या २१ व्या वर्षी मिस युनिव्हर्सचा मुकूट आपल्या नावे केला आहे. त्यामुळे भारतात परतल्यावर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. पण काही लोक असेही आहेत ज्यांनी तिला ‘सुंदर चेहऱ्यामुळे तू मिस युनिव्हर्स झालीस’ असं म्हणत ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हरनाझनं या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देत त्यांची बोलती बंद केली आहे. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत हरनाझ म्हणाली, ‘अनेकांना वाटतं की मला हा मुकूट केवळ माझ्या सुंदर चेहऱ्यामुळे मिळाला आहे किंवा सौंदर्यामुळे मी हा मुकूट जिंकू शकले. पण फक्त मलाच माहीत आहे की यासाठी मी किती मेहनत घेतली आहे. लोकांनी मला सोशल मीडियावर ट्रोल केलं पण अशा लोकांशी वाद घालण्यापेक्षा मला खूप काम करायचं आहे. स्वतःची किंमत काय आहे हे जगाला दाखवून द्यायचं आहे. लोकांची ही मानसिकता दूर करायची आहे.’

या मुलाखतीत हरनाझनं या स्पर्धेची तुलना ऑलिम्पिकशी केली आहे. मी आणि देशातील सर्वांसाठीच हा किताब जिंकणं हे ऑलिम्पिक स्पर्धेपेक्षा कमी नाही. खेळाडूनं देशासाठी पदक जिंकलं तर आपण त्याचं भरभरून कौतुक करतो. मग एक मोठी आणि मानाची सौंदर्य स्पर्धा जिंकणाऱ्या व्यक्तीचं असं कौतुक का केलं जात नाही. अर्थात आता अनेक लोकांचे विचार बदलत आहे. मला आनंद आहे की लोकांची संकुचित मानसिकता दूर करण्यासाठी मी हातभार लावत आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीत हरनाझनं तिच्या बॉलिवूड एंट्रीबाबत महत्त्वपूर्ण विधान केलं होतं. मला एक सामान्य अभिनेत्री व्हायचं नाही असं तिनं म्हटलं होतं. या मुलाखतीत ती म्हणाली होती, ‘मला एक सामान्य अभिनेत्री व्हायचं नाही, मला एक प्रभावशाली अभिनेत्री व्हायचं आहे, जी एक स्ट्रॉन्ग भूमिका निवडते आणि स्त्रिया काय आहेत आणि त्या काय करू शकतात हे दाखवते. या शिवाय स्त्रियांविषयी असलेले पारंपारिक विचार मला त्यातून मोडायचे आहेत. मला माझ्या अभिनयाने लोकांना प्रेरित करायचे आहे’