scorecardresearch

निलाद्रीकुमार आणि झाकीर हुसेन यांच्या जुगलबंदीत रसिक चिंब!

‘हृदयेश फेस्टिव्हलच्या’ पहिल्या दिवसाचे पहिले स्वरपुष्प पं. जयतीर्थ मेवुंडी यांनी सादर केले.

निलाद्रीकुमार आणि झाकीर हुसेन यांच्या जुगलबंदीत रसिक चिंब!

‘लोकसत्ता’ प्रस्तुत ‘हृदयेश फेस्टिव्हल’

तबल्यावर सामान्यांच्या दृष्टीलाही न दिसतील इतक्या वेगाने फिरणारी बोटे आणि त्यातून निघणारे तालाचे तितकेच स्पष्ट बोल आणि सोबतीला सतारीच्या तारांतून कोसळणारा सुरांचा धबधबा यांनी पार्ले-टिळक विद्यालयाचे आसमंत भारून गेले. स्वत: तबलानवाज उस्ताद झाकीर हुसेन आणि अवलिया युवा सतारवादक निलाद्रीकुमार यांची जुगलबंदी साक्षात पाहून, ऐकून आणि अनुभवून पार्लेकर रसिक आनंदात न्हाऊन निघाले..

जुगलबंदीचे निमित्त होते ‘लोकसत्ता’ प्रस्तुत ‘हृदयेश आर्ट्स’ आयोजित तीन दिवसांचा २७ वा ‘हृदयेश फेस्टिव्हल.’ शुक्रवारपासून सुरुवात झालेल्या या सूरमयी कार्यक्रमाला गारठवणाऱ्या थंडीतही गर्दी करत रसिकांनी मैफिलीतील कलावंतांना दाद दिली. या वेळी पं. कार्तिककुमार, गायक सुरेश वाडकर, त्यांच्या पत्नी पद्मा वाडकर, अभिनेते सचिन खेडेकर उपस्थित होते.

शुक्रपासून सुरू झालेल्या ‘हृदयेश फेस्टिव्हल’मध्ये पहिल्याच दिवशी पं. जयतीर्थ मेवुंडी, उस्ताद झाकीर हुसेन, सतारवादक निलाद्रीकुमार यांनी आपले कलाविष्कार सादर केले. या वेळी ज्येष्ठ सतारवादक पं. कार्तिककुमार यांचा उस्ताद झाकीर हुसेन यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शाल, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि १ लाख रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या गौरवाबद्दल पं. कार्तिककुमार यांनी ‘हृदयेश फेस्टिव्हल’च्या आयोजकांचे आभार मानले.

मुंबईतील ‘सवाई गंधर्व महोत्सव’ अशी ख्याती पावलेल्या या कार्यक्रमात झाकीर हुसेन यांचे तबलावादन आणि निलाद्रीकुमार यांचे सतारवादन हे पहिल्या दिवसाचे वैशिष्टय़ ठरले. झाकीर हुसेन यांनी आपल्या मजेशीर व तितक्याच कडक शिस्तीच्या स्वभावाने सुरुवातीलाच कार्यक्रमाची पकड घेतली. मध्येमध्ये होणारी कॅमेऱ्यांची लूडबूड व मोठय़ा टीव्ही स्क्रीनवरील प्रक्षेपण थांबवण्यास सांगत सगळ्यांनी व्यासपीठावर लक्ष केंद्रित करण्याची कडक सूचना त्यांनी केली.

प्रथम विलंबित आणि नंतर द्रुत लयीत सतारवादन करत निलाद्रीकुमार यांनी रागांचे विविध कंगोरे रसिकांपुढे उलगडले. त्यांना साथ देत त्रितालादी अनेक ताल आणि त्यांचे कायदे आपल्या जादुई बोटांनी वाजवून झाकीर यांनी उपस्थितांच्या नजरांना खिळवून ठेवले. या अनोख्या जुगलबंदी वेळी झाकीर व निलाद्रीकुमार यांचे एकमेकांशी होणारे नजरांचे इशारे आणि समेवर येताना त्यांना ‘क्या बात है’चे रसिकांकडून मिळणारे प्रतिसाद याने कलाकार-रसिक संवादाचा अनोखा मेळ पाहण्यास मिळाला. थंडीच्या गारव्यातही रात्री १० नंतर कार्यक्रम संपल्यावर रसिकांनी कलाकार जोडीला ‘वन्स मोअर’ दिला आणि आपल्या जागेवरून उठलेले झाकीर व निलाद्रीकुमार रसिकांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा वादनास बसले. या वेळी निलाद्रीकुमार यांनी ‘तू मेरी जिंदगी है’ या गाण्याच्या चालीवर सतारवादन करत रसिकांना पुन्हा वेगळा आनंद मिळवून दिला.

 ‘सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ची रंगत..

‘हृदयेश फेस्टिव्हलच्या’ पहिल्या दिवसाचे पहिले स्वरपुष्प पं. जयतीर्थ मेवुंडी यांनी सादर केले. पं. मेवुंडी यांनी राग ‘मारवा’चे सूर आळवत ‘तुम बीन मोहे चैन नहीं आऐं’चे स्वर आळवले. या वेळी पं. मेवुंडी यांनी घेतलेल्या अनेक हरकतींना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. त्यांनंतर ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांनी गायलेली व राग ‘गावती’ आणि रूपक तालातील बंदिश ‘कान्हा रे कान्हा तुझको बुलाएँ’ ही बंदिश गात रसिकांना मंत्रमुग्ध केले. यानंतर रसिकांच्या आग्रहास्तव त्यांनी ‘सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ हे कानडी भजन गात मैफिलीत रंगत आणली.

गंधर्व लोकी असल्याची अनुभूती..

ज्येष्ठ सतारवादक आणि भारतरत्न पं. रविशंकर यांच्या पहिल्या शिष्यांपैकी एक असलेले पं. कार्तिककुमार यांच्या आजवरच्या सुरेल कारकिर्दीबद्दल ‘हृदयेश फेस्टिव्हल’तर्फे त्यांचा गौरव करण्यात आला. उस्ताद झाकीर हुसेन यांच्याकडून गौरव झाल्याबद्दल तसेच शास्त्रीय संगीत मैफल ऐकण्यासाठी जमलेल्या रसिकांना पाहून आपण गंधर्व लोकांत असल्याचा भास होत असल्याची भावना पं. कार्तिककुमार यांनी व्यक्त केली. या वेळी ७-८ वर्षांचा असल्यापासून पं. कार्तिककुमार यांना आपण ओळखत असून माझ्या लहानपणी पं. रविशंकर यांनी आयोजित केलेल्या ‘नवरसरंग’ कार्यक्रमात आपल्याला त्यांना साथ करण्याची संधी मिळाल्याच्या आठवणींना झाकीर हुसेन यांनी उजाळा दिला. या वेळी निलाद्रीकुमारसारखा उत्तम सातरवादक त्यांनी रसिकांना दिला आहे. असेही हुसेन म्हणाले.

हृदयेश फेस्टिव्हलमध्ये आज

कौशिकी चक्रवर्ती (गायन), राकेश चौरसिया (बासरी) आणि पं. मुकुल शिवपुत्र (गायन) तसेच पं. मुकुल शिवपुत्र यांच्या ६१ व्या वर्षपूर्तीनिमित्त त्यांचा सत्कार- हस्ते ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर.

वेळ- संध्याकाळी साडेपाच वाजता

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-01-2017 at 01:12 IST
ताज्या बातम्या