व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने प्रेम, भावना व्यक्त करण्याचेच वारे सर्वत्र वाहत आहेत. या साऱ्यामध्ये टेलिव्हिजन कलाकारही  मागे नाहीत. अशाच काही टेलिव्हिजन कलाकारांमधील एका जोडीचं नाव म्हणजे अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि अभिनेता विवेक दाहिया. दिव्यांका आणि विवेक हे दोघेही सध्या त्यांच्या मालिकांच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र असले तरीही ते एकमेकांनाही तितकाच वेळ देतात. लग्नानंतर आलेल्या पहिल्याच व्हॅलेंटाइन डे च्या निमित्ताने विवेकने दिव्यांकासाठी खास बेत आखला आहे. ज्यासाठी ते दोघेही गोव्याला रवाना झाले आहेत. दिव्यांकासाठी या व्हॅलेंटाइन डे ला काहीतरी खास बेत आखण्याचा मनसुबा बाळगणाऱ्या विवेकने सरतेशेवटी दोन दिवसांचा गोव्याचा बेत आखत तिला आश्चर्याचा धक्का दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिव्यांका आणि विवेक या दोघांचाही एक वेगळा असा चाहता वर्ग आहे. टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध जोड्यांमध्येही या दोघांच्या नावालाच प्राधान्य दिले जाते. त्यामुळे कामाच्या व्यग्र वेळापत्रकातूनही विवेकने दिव्यांकाला दिलेले हे खास सरप्राइज तिच्या व्हॅलेंटाइन डे चे महत्त्व वाढवून गेले असणार यात शंकाच नाही.

२०१६ मध्ये विवाहबद्ध झालेल्या काही कलाकार जोड्यांपैकी एक म्हणजे दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दाहिया. काही महिन्यांपूर्वी दोघेही भोपाळमध्ये एका पारंपारिक विवाहसोहळ्यात विवाहबद्ध झाले होते. हिंदू रिती-रिवाजानुसार पार पडलेल्या या विवाहसोहळ्यात वधू आणि वर हे दोघेही अतिशय सुंदर दिसत होते.

राजेशाही थाटात पार पडलेल्या या विवाहसोहळ्यात दिव्यांकाने लाल रंगाचा ‘लेहंगा’ आणि त्यावर साजेसे सुवर्णालंकार परिधान केले होते. मित्रपरिवार आणि आप्तेष्टांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या विवाहसोहळ्याची सर्वत्र चर्चा होती. किंबहुना आजही या जोडप्याविषयी नेहमीच प्रेक्षकांमध्ये कुतुहलाचे वातावरण पाहायला मिळते. दिव्यांका ही ‘स्टार’ वाहिनीच्या ‘ये है मोहोब्बते’ या मालिकेतून ‘इशिता भल्ला’ (इशिमा) या सालस भूमिकेतून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Valentines day 2017 husband vivek dahiya plan a surprise for wife divyanka tripathi
First published on: 14-02-2017 at 13:05 IST