टाळेबंदीत पडदा पडलेल्या कलाकृतींना पुन्हा सादरीकरणाचे वेध

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : करोनामुळे नाटय़सृष्टीवर पडलेला पडदा काही निर्मात्यांनी धाडस करून डिसेंबरअखेरीस बाजूला केला. हा ‘पुन्हा नव्याने सुरुवात’चा नारा कितपत यशस्वी होईल याबाबत नाटय़परिघात साशंकता व्यक्त केली जात असतानाच प्रेक्षकांनी दिलेला उदंड प्रतिसाद पाहून अनेक निर्माते जोरदार तयारीला लागले आहेत. त्यामुळे करोनाकाळात थांबलेल्या आणि काही नवीन अशा विविध नाटय़कृती जानेवारी महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि आर्थिक गणिताबाबत संभ्रमात असलेल्या नाटय़सृष्टीने वर्षअखेरीस पुनरागमनाची नांदी केली. सद्य:स्थितीत  नाटक करणे ही जोखीम असल्याने काही मोजक्याच संस्थांनी पुढाकार घेतला; परंतु गेल्या काही आठवडय़ांत प्रेक्षकांनी नाटकावर दाखविलेल्या विश्वासामुळे नाटय़सृष्टीत पोषक वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी वर्षअखेरीस पुन्हा सुरू झालेली नाटय़सृष्टी नव्या वर्षांत अधिकच गतिमान होण्याची चिन्हे आहेत. जानेवारीत साधारण पंधरा ते सोळा नाटकांचे प्रयोग अपेक्षित असून यात काही नवीन नाटकांचाही समावेश

असल्याचे समजते. ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, प्रतीक्षा लोणकर यांचे ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांचे ‘व्हॅक्यूम क्लीनर’ या दोन नाटकांचे ९ आणि १० जानेवारीला मुंबई-पुण्यात प्रयोग होणार आहेत. शुभांगी गोखले आणि प्रशांत दामले यांचे ‘साखर खाल्लेला माणूस’ हे नाटक जानेवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात, तर सुनील बर्वे यांचे ‘तिसरे बादशाह हम’ आणि मंगेश कदम यांचे ‘के दिल अभी भरा नही’ हे शेवटच्या आठवडय़ात येणार आहे. उमेश कामत यांचे ‘दादा एक गुड न्यूज आहे’ हे नाटकदेखील याच दरम्यान येईल, तर अद्वैत थिएटर्सचे ‘आरण्यक’, ‘इब्लिस’, ‘अलबत्या-गलबत्या’, ‘निम्मा शिम्मा राक्षस’ याही कलाकृती प्रयोगांसाठी सज्ज आहेत. येत्या नवीन वर्षांत तीन नव्या कलाकृती घेऊन येत असल्याची घोषणा २२ डिसेंबरला भद्रकालीचे निर्माते प्रसाद कांबळी यांनी केली, तर ‘देवबाभळी’ आणि ‘वस्त्रहरण’ या कलाकृतीही लवकरच पाहायला मिळतील, असे कांबळी यांनी सांगितले. संदीप पाठक यांच्या एकपात्री अभिनयाने गाजलेल्या ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या नाटकाचा २७ डिसेंबरला पुण्यात प्रयोग झाला, पुढेही हा दौरा असाच सुरू राहणार आहे. फेब्रुवारी महिन्यात राजेश देशपांडे दिग्दर्शित आणि प्रिया बेर्डे निर्मित ‘लाखाची गोष्ट’ हे नवेकोरे विनोदी नाटक, ‘शांतेचं कार्ट चालू आहे’, ‘ह्याचं करायचं काय’ आदी नाटकांची तिसरी घंटा वाजेल.

जानेवारीतील नाटय़ मेजवानी 

‘आमने-सामने’, ‘यदा कदाचित’, ‘इशारो इशारो में’, ‘सही रे सही’, ‘संत तुकाराम’, ‘तू म्हणशील तसं’, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’, ‘व्हॅक्यूम क्लीनर’, ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’, ‘साखर खाल्लेला माणूस’, ‘दादा, एक गुड न्यूज आहे’, ‘के दिल अभी भरा नहीं’, ‘आरण्यक’, ‘इब्लिस’, ‘निम्मा शिम्मा राक्षस’, ‘अलबत्या- गलबत्या’.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Various marathi plays are coming to the audience in the month of january zws
First published on: 30-12-2020 at 02:48 IST