‘मैंने प्यार किया’मधील रिमा लागू यांनी साकारलेली आई आजही अनेकांच्या लक्षात आहे. मातृत्व आणि पत्नी धर्म यांमध्ये अडकलेली आई रिमा यांनी चांगलीच साकारली होती. आजही टीव्हीवर हा सिनेमा लागला की, रिमोट आपसूक बाजूला ठेवून सिनेमा पाहिला जातो. या सिनेमामुळे रिमा यांच्या करिअरला नवीन उभारी मिळाली.
सलमान खाननेही नुकतेच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यातही सलमान आणि रिमा यांच्या वयात फारसे अंतर नव्हते. रिमा या सलमानपेक्षा फक्त आठ ते नऊ वर्षांनीच मोठ्या होत्या. या सिनेमावेळी त्यांचे वय ३० ते ३५ वर्षांच्या आसपास होते. अशात सलमानची आई साकारणं तसं आव्हानच होतं. पण सुरज बडजात्या यांनी या सिनेमात बॉलिवूडपटात दाखवतात तशी टिपिकल केस पांढरे असलेली, खंगलेली आई न दाखवता रिमा लागू यांच्या लूकवर काम केले आणि देशाला नवीन आईची ओळख करून दिली. पण मेकअपच सगळं काही करतो असे नाही ना.. रिमा यांनी त्यांच्या अभिनयाने ही व्यक्तिरेखा अशापद्धतीने साकारली की आजही ‘मैंने प्यार किया’ म्हटलं की रिमा यांची ती व्यक्तिरेखा डोळ्यांसमोरून जात नाही.
दरम्यान, आज सकाळी रिमा लागू यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ५९ वर्षांच्या होत्या. बुधवारी रात्री छातीत दुखत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री एकच्या सुमारास रिमाताईंचे निधन झाल्याची माहिती त्यांचे जावई विनय वायकुळ यांनी दिली. ओशिवरा येथील स्मशानभूमीत गुरुवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.