मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री वत्सला देशमुख (वय-९२) यांचे आज (शनिवार) निधन झाले. प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या त्या आई होत्या. एकेकाळी प्रचंड गाजलेला मराठी चित्रपट पिंजरा मध्ये वत्सला देशमुख यांनी भूमिका साकरली होती. या चित्रपटातील त्यांचे संवाद देखील चांगलेच गाजले होते. याशिवाय अनेक चित्रपटांमध्ये वत्सला देशमुख यांनी प्रमुख अभिनेत्री व सहाय्यक अभिनेत्री म्हणून भूमिका निभावल्या आहेत. याशिवाय, आई, मावशी, काकू, आत्या, आजी अशा अनेक भूमिका देखील त्यांनी साकारलेल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी फेसबुकवर पोस्ट करून वत्सला देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ”वत्सला देशमुख ह्या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री रंजना देशमुख हिच्या आई होत्या. त्यांनी आपल्या करीअरची सुरुवात हिंदी चित्रपट तुफान और दिया या चित्रपटातून केली होती. मग त्यांचे फायर, नागपंचमी, जल बिन मच्छली नृत्य बिन बिजली असे अनेक चित्रपट त्यावेळी गाजले होते. पण खऱ्या अर्थाने त्यांना ओळख मिळाली ती सुहाग ह्या चित्रपटातून त्यांचे नाव घरोघरी पोहचले होते.मग त्यांनी पिंजरा आणि नवरंग चित्रपटात सुद्धा काम केले होते. अशा हूरहुन्नरी अभिनेत्री च्या जाण्याने चित्रपट क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.”

वत्सला देशमुख यांचे वडील श्रीधरपंत देशमुख हे बापुराव पेंढारकर यांच्या ललितकलादर्श कंपनीत होते. वत्सला यांची बहिण प्रसिद्ध अभिनेत्री संध्या या देखील सिनेसृष्टीत आहे. तर मुलगी रंजना यांनी देखील मराठी सिनेसृष्टीत मोलाचे योगदान दिले.

पिंजरा चित्रपटामधील गाजलेले संवाद –

“ ‘अवं मास्तर काही कळतं का नाही? रांगोळी काढलेली दिसत नाही व्हय? इथं चंद्रकला आणि सरकार बसणार आहेत, जरा मान-पान बघत चला, की दिसला पाट अनं टेकलं बूड, तुमची पानं बाहेर मांडली आहेत, तिकडं जाऊन बसा.. ”

“ ‘काय म्हणावं या मास्तरला, डोस्कं बिस्कं फिरलया का अक्कल गहाण ठिवून आलायसा, काय म्हणते मी, नीट गुमान राव्हायचं असलं तर राव्हा, नाहीतर चालू पडा. तुम्ही गेल्यावर कोणाला सुतक येणार नाही.. ”

खरे तर वत्सला देशमुख यांनी त्यांच्या प्रदीर्घ नाटय़-चित्रपट प्रवासात ‘पिंजरा’मधील थोडय़ाफार प्रमाणात खलनायिकेकडे झुकणारी ‘आक्का’ची भूमिका वगळली तर खलनायिका किंवा खाष्ट भूमिका केलेल्या नाहीत. प्रेक्षकांच्या मनावरही त्यांच्या या भूमिकांचाच ठसा राहिलेला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran actress vatsala deshmukh passes away msr
First published on: 12-03-2022 at 18:49 IST