महागड्या कार आणि बाईक्सवर स्टंट करण्यासाठी ओळखला जाणारा अभिनेता अजय देवगण लवकरच ‘रेड’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तो पुन्हा एकदा सरकारी सेवेत असणाऱ्या एका कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्या आगामी ‘रेड’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. त्यामागोमागच आता या चित्रपटातील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘ब्लॅक जमा है..’. असे बोल असणारं हे गाणं सुखविंदर सिंहने त्याच्या दमदार आवाजात गायलं आहे.
इंद्रनीलच्या लेखणीतून उतरलेल्या या गाण्याला तरुणाईचा आवडता संगीतकार अमित त्रिवेदी यांने संगीत दिलं आहे. गायक, गीतकार आणि संगीतकार हे समीकरण अगदी योग्यप्रमाणे जुळून आल्यामुळे ‘ब्लॅक जमा है’ प्रभावीपणे साकारण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. या गाण्यात करबुडव्यांच्या घरी धाड टाकण्यासाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांची काम करण्याची पद्धत, करबुडव्यांची वृत्ती आणि ८० च्या दशकातला काळ सुरेखरित्या साकारण्यात आला आहे. मुळात एका सत्यघटनेचा आधार घेत साकारण्यात येणाऱ्या या चित्रपटातील गाणं पाहता दिग्दर्शकाने बरेच बारकावे टीपण्यावर भर दिल्याचं लगेचच लक्षात येत आहे.
वाचा : प्रिय आईस.. तू माझं सर्वस्व होतीस, जान्हवी कपूरने जागवल्या श्रीदेवींच्या आठवणी
‘रेड’मधील या पहिल्या गाण्यात अभिनेता सौरभ शुक्ला आणि अजय देवगणच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळत आहे. त्याशिवाय, साम दाम दंड भेदाची रणनिती अवलंबणाऱ्या अजयचा लूकही सर्वांची मनं जिंकत आहे. ‘पॅनोरमा स्टुडिओज’ची निर्मिती आणि राजकुमार गुप्ताचं दिग्दर्शन असणारा हा चित्रपट १६ मार्चला प्रदर्शित होणार आहे.