मुंबईतच लहानाची मोठी झाल्याने मराठी भाषेत विद्या बालनला बोलता येतं. तिला मराठी समजतंही आणि आता तर ती चक्क मराठी चित्रपटात काम करते आहे. ‘एक अलबेला’ या भगवानदादांवर आधारित चित्रपटात ती गीता बालीच्या भूमिकेत आहे. गीता बाली हिंदी असल्याने विद्याच्या तोंडी हिंदी संवाद असणार आहेत. तिला मराठी बोलण्याची गरज नाही, हे लक्षात घेऊन निर्माता-दिग्दर्शकांनी या भूमिकेसाठी विद्याची निवड केली होती. पण सध्या कॅमेऱ्यासमोरची हिंदी सोडली, तर सेटवर सदासर्वकाळ विद्या सगळ्यांशी मराठीतून संवाद साधत असल्याने ‘एक अलबेला’च्या सेटवरची सगळी मंडळी भलतीच खूश झाली आहेत.
‘एक अलबेला’ या चित्रपटात गीता बालीच्या भूमिकेसाठी विद्याला विचारणा झाली, तेव्हा तिला मराठीत संवाद म्हणायचे नाहीत हे डोक्यात ठेवूनच पुढची प्रक्रिया पार पडली होती. खुद्द विद्यानेही मला मराठी बोलता येत असलं तरी चित्रपटात काम करण्यासाठी तुमचं तुमच्या भाषेवर प्रभुत्व असणं गरजेचं असतं. मराठी भाषेवर प्रभुत्व नसल्याने आतापर्यंत मराठी चित्रपटांचा विचार केला नसल्याचे विद्याने स्पष्ट केले होते. ‘एक अलबेला’ हा भगवानदादांवरचा चित्रपट आहे आणि त्याची पटकथाही विद्याला आवडली होती. शिवाय, तिला यात हिंदूीच संवाद बोलायचे होते त्यामुळे कुठलेही आढेवेढे न घेता तिने या चित्रपटासाठी होकार दिला.
विद्या सध्या या चित्रपटासाठी गोरेगावच्या चित्रनगरीत चित्रीकरण करते आहे. मराठी चित्रपटातील आपल्या पदार्पणाबद्दल जाम खूश असलेली विद्या सेटवर सगळ्यांशी मराठीतच गप्पा मारते आहे.
विद्याला एवढं चांगलं मराठी बोलता येतं याची आम्हाला कल्पना नव्हती. पण आता तिला मराठीत बोलताना ऐकल्यानंतर यापुढचा चित्रपट तिच्याच बरोबर आणि मराठीत करायचा निर्णय घेतला असल्याचे चित्रपटाचे निर्माता मोनीष बोबरे यांनी सांगितले. विद्याची चित्रपटातील व्यक्तिरेखा पूर्णपणे हिंदी बोलणारी आहे. त्यामुळे विद्याला आमच्याबरोबर मराठी चित्रपटात काम करणे अवघड जाणार नाही, असा आमचा विचार होता. पण तिचे मराठी ऐकल्यानंतर भविष्यात तिच्याबरोबर मराठीतच चित्रपट करायची इच्छा बोबरे यांनी व्यक्त केली.
चेंबूरमध्ये मराठमोळ्या कुटुंबांबरोबर वाढलेल्या विद्या बालनला मराठी बोलणं ही समस्या नाही. चांगलं मराठी बोलणं ही समस्या आहे. पण, त्यावरही ती लवकरच मात करेल आणि भविष्यात मराठीतही ती आपली कमाल दाखवेल, अशी आशा करायला हरकत नाही.