अभिनेते विद्याधर जोशी म्हटले की प्रेक्षकांना आठवतो ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’मधील ‘गोसालिया’ हा बिल्डर. अस्सल महाराष्ट्रीय असलेले जोशी आणि ‘अमराठी व्यक्तिरेखा’ असे जणू काही समीकरण झाले आहे. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ चित्रपटातील गोसालिया बिल्डर, ‘हापूस’ चित्रपटातील आंब्याचा व्यापारी छाजेड किंवा’ ’अर्जुन’मधील उद्योगपती रतन शहा असो, प्रत्येक चित्रपटातील भूमिका आपल्या अभिनयाच्या सामर्थ्यांवर विद्याधर जोशी यांनी लीलया पेलली आहे. आता आगामी ‘मराठी टायगर्स’ या चित्रपटात ते कानडी व्यक्तिरेखा रंगवत आहेत. या चित्रपटासाठी जोशी यांचा लूक पूर्णपणे बदलण्यात आला असून कपाळावर भस्माचे पट्टे, जाड व झुपकेदार मिशा आणि बारीक केस असा टिपिकल लूक त्यांना देण्यात आला आहे.