समाजात घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब जसं रूपेरी पडद्यावर उमटत असतं तसंच मानवी नात्यांचं प्रतिबिंबही चित्रपटांच्या माध्यमातून समोर येत असतं. आजवर विखुरलेल्या नातेसंबंधांसोबतच नात्यांची घट्ट विण असलेल्या कथाही प्रेक्षकांना रूपेरी पडद्यावर पाहायला मिळाल्या आहेत. आतापर्यंत बऱ्याच दिग्दर्शकांनी आपापल्या नजरेतून नात्यांची कथा मांडली असली तरी यातील विविध पैलू नेहमीच समोर येत असतात. महागणपती फिल्म्सच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या ‘खोपा’ या आगामी मराठी चित्रपटातही अशाच मानवी नात्यांची कथा पाहायला मिळणार असून येत्या २६ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
महागणपती फिल्म्स अंतर्गत जालिंदर भुजबळ यांची निर्मिती तसेच अर्जुन भुजबळ यांची सहनिर्मिती असलेल्या ‘खोपा’ या चित्रपटाचं दिग्दर्शन डॉ. सुधीर निकम यांनी केलं आहे. नातेसंबंध हा मानवी जीवनाचा गाभा आहे. काही माणसं नातेसंबंधांपासून पळ काढत स्वतःचं एक वेगळ विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, पण कालांतराने त्यांना आपल्या चुका समजतात आणि पुन्हा ते आपल्या नातलगांचा शोध घेत फिरतात. समाजात वावरताना ठराविक अंतराने आपल्याला हे चित्र पाहायला मिळतं, पण या चित्रपटात मात्र प्रेक्षकांना नातेसंबंध जोडणाऱ्या शंभर नंबरी सोनं असलेल्या माणसांची कथा पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथा एका लहान मुलाभोवती गुंफण्यात आली आहे. कथा जरी लहान मुलाला केंद्रस्थानी ठेवून लिहिण्यात आली असली तरी लहान मुलांच्या भावविश्वावर नसून त्याच्या भोवतीच्या नातेसंबंधांवर आधारित आहे.
आजवर बऱ्याच चित्रपटांचं लेखन केलेल्या डॉ. सुधीर निकम यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. लेखनाकडून दिग्दर्शनाकडे वळताना त्यांनी आपल्या चित्रपटासाठी मानवी नातेसंबंधांसारखा भावनिक विषय निवडला आहे. याबाबत ते म्हणतात की, आजच्या धावपळीच्या युगात नातेसंबंध दुरावत असल्याचं आपण सर्वजण पाहात आहोत. खरं तर या काळात नातेसंबंध जपण्याची गरज आहे, त्यामुळेच या चित्रपटाच्या माध्यमातून समाजापर्यंत एक संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एका लहान मुलाच्या आयुष्यात अचानक एक घटना घडते, त्यामुळे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. अशा परिस्थितीत काहीही नाते नसलेल्या व्यक्ती त्यांना जीवन सावरण्यात मदत करतात अशी या चित्रपटाची कथा आहे.