scorecardresearch

‘अ‍ॅट एनी कॉस्ट’ ही उद्ध्वस्त माणसांची गोष्ट’

अभिराम भडकमकर यांची ‘अ‍ॅट एनी कॉस्ट’ ही कादंबरी वाचल्यानंतर ती लिहिण्यामागील त्यांची तडफड मला तीव्रतेने जाणवली

अभिराम भडकमकर यांची ‘अ‍ॅट एनी कॉस्ट’ ही कादंबरी वाचल्यानंतर ती लिहिण्यामागील त्यांची तडफड मला तीव्रतेने जाणवली आणि मी भीषणरीत्या अस्वस्थ झालो. मी स्वत: गेली चाळीसेक वर्षे छोटय़ा पडद्यावर काम करतो आहे. त्यामुळे या माध्यमातल्या मंडळींचे जे चित्रण अभिरामने केले आहे, त्या सगळ्या पात्रांना मी स्वत: प्रत्यक्ष पाहिले आहे, त्यांना भेटलेलो आहे. काळाच्या प्रचंड गतीबरोबर स्वत:ला जोडून घेता आले नाही तर माणसांचे काय होते, हे या कादंबरीत भेदकपणे दाखवले आहे. याकरता मला ही कादंबरी महत्त्वाची वाटते, असे उद्गार ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी काढले. ‘अ‍ॅट एनी कॉस्ट’ या कादंबरीवर आयोजित परिसंवादात ते बोलत होते.
मनोरंजन वाहिन्यांच्या विश्वावर क्ष-किरण टाकणाऱ्या या कादंबरीवरील चर्चेत बहुतेक वक्त्यांनी लेखकाच्या चित्रणाशी सहमती दर्शविली. झी मराठीचे बिझनेस हेड तसेच प्रायोगिक नाटय़-चळवळीशी निगडित असलेले दीपक राजाध्यक्ष यांनी मात्र कादंबरीत चित्रित केलेल्या काही गोष्टींशी असहमती व्यक्त केली. आपल्याला ही कादंबरी आवडली असली तरी त्यात टीव्ही माध्यमाचे जे चित्र रंगविण्यात आले आहे ते पूर्णत: सत्य नाही, असे सांगून ते म्हणाले की, दूरचित्रवाहिन्यांकडे आज सॉफ्ट टार्गेट म्हणून पाहिले जाते. या माध्यमाबद्दल कादंबरीत खूपच नकारात्मक सूर लावला गेला आहे. प्रत्यक्षात हे माध्यम काही चांगल्या गोष्टीही करीत असते. लोकांना जोडण्याचे, जवळ आणण्याचे काम ते करते. माझ्या मते, टीव्ही दोन कारणांसाठी पाहिला जातो. एक म्हणजे प्रेरणा मिळवण्यासाठी किंवा दुसरं म्हणजे दैनंदिन जगण्यातील तापत्रयांपासून दूर पळण्यासाठी! सध्या टीव्हीवरचे काही कार्यक्रम पाहून प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याची वृत्ती बोकाळतेय की काय, अशी जी भीती या कादंबरीत व्यक्त केली गेली आहे, ती खरीच आहे. परंतु त्याचबरोबर या माध्यमाद्वारे काही सकारात्मक गोष्टीही होत असतात याची मात्र नोंद घेतली जात नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर यांनी तर आपल्या भाषणात टीव्ही माध्यमाचा साधार पंचनामाच केला. आज प्रत्येक गोष्टीचे बाजारीकरण करणाऱ्या या युगात टीव्ही या माध्यमाकडून माणसाचे ‘वस्तू’करण कसे केले जाते याचे प्रत्ययकारी दर्शन या कादंबरीत घडते, असे सांगून ते पुढे म्हणाले, टीव्हीचे प्रॉफिट हे प्रेक्षकांच्या खिशातून येत नाही, तर ते जाहिरातींतून येते. त्यामुळे दोन जाहिरातींच्या मधे दाखवण्याची गोष्ट म्हणजे टीव्ही मालिका, हाच त्यांचा या मालिकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन असतो. त्यामुळे त्यांना कसलाही विचार न करता आपले प्रॉडक्ट घेणारे ग्राहक हवे आहेत.
ते या गुंगी आणणाऱ्या मालिकांद्वारे घडविले जातात, असा टोलाही त्यांनी दिला. ही कादंबरी म्हणजे संवेदनशील लेखक आणि सजग माणूस असलेल्या अभिराम भडकमकर यांचे एक प्रकारे स्वगतच आहे. टीव्ही मीडियातील व्यक्तींचे त्यांनी केलेले चित्रण मीही या इंडस्ट्रीचा एक भाग असल्याने मला पूर्णपणे परिचित आहे. कादंबरीतील अरविंद आणि आभास यांच्याप्रमाणेच आजच्या कुठल्याही संवेदनशील माणसाचा अंतर्यामीचा झगडा मला त्यात दिसून येतो. मार्केट इकॉनॉमीचा सर्वाधिक पगडा असलेले टीव्ही हे माध्यम आहे. तिथे कोणत्या थराला जाऊन एखादी गोष्ट विकली जाते, हे कादंबरीत समर्थपणे दाखवले आहे. दिवसेंदिवस टीव्ही हे माध्यम अधिकाधिक व्यभिचारी बनत चालले आहे, असे मत नाटककार-चित्रपटकार संजय पवार यांनी मांडले. या कादंबरीद्वारे अभिराम भडकमकर यांनी मोठीच झेप घेतली आहे. शहरी जीवनावर पगडा असलेल्या विषयावर यशस्वी कादंबरी लिहिणारा लेखक त्यांच्या रूपाने आपल्याला सापडला आहे, अशी ग्वाही कादंबरीकार विश्वास पाटील यांनी यावेळी दिली. ‘प्रतिभेबरोबरच कलेला मार्केटमध्ये उजवण्याची कलाही कलावंतापाशी असायला हवी असे मला अलीकडे वाटायला लागले आहे, आणि त्यातूनच माझी ही कादंबरी आकाराला आली,’ अशी कबुली अभिराम भडकमकर यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. योगेश्वर पब्लिकेशन्सचे किशोर धारगळकर यांनी परिसंवाद आयोजनामागची भूमिका विशद केली.
‘माझ्या मनात गोंधळ उडालाय’
अभिनेते जितेंद्र जोशी यांनी, या कादंबरीमुळे एक अभिनेता व एक माणूस म्हणून माझ्या मनात गोंधळ उडवला आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले, या कादंबरीत मला माझा चेहरा थोडा थोडा दिसला, अशी स्पष्ट कबुली दिली. या जगात यशस्वी आणि अयशस्वी असे दोनच वर्ग असतात का, असा प्रश्न मला पडतो. कादंबरीतल्या अरविंद आणि आभाससारखाच माझाही स्वत:शीच झगडा सुरू असतो. एक अभिनेता म्हणून मी कामाच्या बाबतीत चोखंदळ राहायचे, की घरसंसार चालवण्यासाठी तडजोडी करायच्या, असा प्रश्न मला पडतो. त्यामुळे ही दोन्ही पात्रे माझ्यात आहेत असे मला वाटते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vikram gokhale spoke about at any cost novel

ताज्या बातम्या