‘पवित्रा रिश्ता’फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा ती तिचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. यात अनेक जण तिच्यावर कौतुकाचा वर्षावही करतात. मात्र, काही वेळा तिच्यावर ट्रोल होण्याचीही वेळ आलेली आहे. अलिकडेच अंकिताने एक व्हिडीओ शेअर केला असून हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला खडे बोल सुनावले आहेत.
शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अंकिता ‘हवा के झोंके आज मौंसमों से रुठ गए’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी तिने साडी नेसली असून ‘साडी, डान्स आणि सुंदर गाणं’, असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. मात्र, तिचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांना काही पटलेला दिसत नाही. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी तिच्यावर टीकास्त्र डागलं आहे.
सुशांतला न्याय मिळण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारी अंकिता इतक्या लवकर सगळं कसं काय विसरली असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. ‘७ वर्षांचं प्रेम इतक्या सहजासहजी विसरलीस कसं असं एका नेटकऱ्याने विचारलं आहे’. तर ‘तुझ्यापेक्षा सुशांतचे चाहते आहेत, जे त्याला अजूनही विसरु शकत नाहीयेत’, असं अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.
दरम्यान, अंकिता आणि सुशांत जवळपास ७ वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यामुळे सुशांतचं निधन झाल्यावर अंकिताला प्रचंड धक्का बसला होता. त्याला न्याय मिळावा यासाठी ती सातत्याने प्रयत्नदेखील करत होती. मात्र, तिचा हा नवा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी तिच्यावर संतापले आहेत.